श्रीगोंदा : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्या श्रीगोंदा येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन समारंभास काँग्रेसचे आमदार डॉ. सुधीर तांबे, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी हजेरी लावत मनाचा मोठेपणा दाखविला. मात्र, फीत कापण्याची कात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा वर्षा शिवले यांच्या हाती देऊन शेलारांनी मित्र पक्षातील नेत्यांनाच ऐनवेळी काटशह दिल्याची चर्चा आहे.
यावेळी माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, भाऊसाहेब खेतमाळीस, संजय आनंदकर, समीर बोरा, स्मितल वाबळे आदी उपस्थित होते.
सध्या माजी आमदार राहुल जगताप, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.
त्यावर राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनीही जनसंपर्क कार्यालय सुरू करून विधानसभा निवडणूक मैदानात उतरणार असल्याचे संकेत दिले. शेलारांच्या जनसंपर्क कार्यालयास मित्र पक्षाचे आमदार डॉ. सुधीर तांबे व नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी हजेरी लावली. मात्र, शेलारांनी उद्घाटनाची रेबिन कापण्याची कात्री राष्ट्रवादीवर महिला पदाधिकाऱ्यांच्या हाती देऊन मित्र पक्षांतील नेत्यांना २०१९ मधील विधानसभा निवडणुकीतील विरोधी भूमिकेची जाणीव करून दिल्याची चर्चा शहरासह तालुक्यात आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी करण्यासाठी महाविकास आघाडीतील नेते सरसावले आहेत. मात्र, या नेत्यांच्या मनात राजकीय सूड आणि सुंदोपसुंदीची धग कायम असल्याचे दिसून येते. आमदार बबनराव पाचपुते हे घशाच्या व्याधीने त्रस्त आहेत. मात्र, मतदारसंघातील घडामोडींवर त्यांचे बारीक लक्ष आहे. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती उपसभापती निवडणुकीत पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी सदस्यांची जुळवाजुळव करून बाजी मारली. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह वाढला आहे.
---
२० श्रीगोंदा शेलार
श्रीगोंदा येथे घनश्याम शेलार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा वर्षा शिवले.