योगेश गुंड , नगर नगर तालुक्यातील सहा जि. प. गटांची फेररचना झाली असून, तालुक्यातील दोन गट नामशेष होऊन नव्याने दोन गट उद्यास आले आहेत. या फेररचनेमुळे अनेक दिग्गज राजकीय आखाड्यात आमने-सामने येणार आहेत. तालुक्याचा सर्व भूगोल बदलल्याने आता निवडणुकीत नवा राजकीय इतिहास घडणार का? याचीच चर्चा नगर तालुक्यात जोर धरत आहे.तालुक्यातील सहा गटांमध्ये बरीच मोडतोड झाल्याने विद्यमान सदस्यांपैकी बाळासाहेब हराळ, बाजीराव गवारे, मंदा गायकवाड, दत्ता सदाफुले, पूनम भिंगारदिवे या चार सदस्यांची राजकीय कोंडी झाली आहे. यातील हराळ आपली पत्नी अनिता यांना आपल्या जागेवर मैदानात उतरवू शकतात, मात्र त्यांचा दहा वर्ष जि. प. बैठकांमध्ये घुमणारा आवाज आता बंद होणार आहे. निंबळक गट सर्वसाधारण झाला असला, तरी या गटात माजी सदस्य संदेश कार्ले यांची हक्काची गावे चास, कामरगाव, भोयरे पठार, अकोळनेर, भोरवाडी, सोनेवाडी आता निंबळक गटात गेल्याने त्यांचा आग्रह या गटातून उमेदवारी करण्याचा राहू शकतो. येथे माधवराव लामखडे तयारीत असले, तरी त्यांना माजी सदस्य अरुण होळकर यांचेही आव्हान राहणार आहे. लामखडे यांना कार्ले यांच्याशी ही लढत द्यावी लागणार असल्याची शक्यता आहे. वाळकी गटात जुन्या अरणगाव गटातील खडकी, सारोळा कासार, घोसपुरी, बाबुर्डी बेंद ही सेनेची हक्काची गावे समाविष्ट झाली आहेत. येथून हराळ दहा वर्षांपासून निवडून येत आहेत. हराळ यांचा गट शाबूत असला, तरी नव्या समाविष्ट गावांत त्यांना ताकद अजमावी लागणार आहे. नव्याने तयार झालेला दरेवाडी गट भौगोलिकदृष्ट्या किचकट आहे. सेनेच्या दोन जि. प. सदस्यांचा मिळून हा नवा गट तयार झाला आहे.अरणगाव, खंडाळा, बुरुडगाव ते थेट चिचोंडी पाटील असा गैरसोयीचा हा गट सोपा नाही. अनेकांना या गटावर प्रभुत्व सिद्ध करताना नाकीनऊ येणार आहे. आष्टी रस्ता-दौंड रस्त्यालगत गावे यात आहेत. संदेश कार्ले येथे ही नशीब आजमाऊ शकतात. कारण त्यांचा अर्धा गट यात समाविष्ट आहे. नागरदेवळे हाही नवा गट तयार झाला आहे. यात हा सर्वसाधारण असल्याने येथे आ. शिवाजी कर्डिले यांच्या घरातील युवा नेता लढणार असे बोलले जात आहे. पण त्यांचे बुऱ्हाणनगर गाव यात समाविष्ट नाही. रांजणी, माथणी ही गर्भगिरीतील गावे, तसेच वडारवाडीपासून पारेवाडीपर्यंत पाथर्डी रस्त्यावरील गावे या गटात समाविष्ट आहेत. जेऊर गटात कापूरवाडी, बुऱ्हाणनगर, वारुळवाडी, देवगाव, आगडगाव ही कर्डिले यांची होमग्राउंडची गावे, तसेच औरंगाबाद रस्त्यावरील गावांचा यात समावेश आहे. येथे गोविंद मोकाटे सौभाग्यवतींसाठी तयारीत आहेत. अमोल जाधव येथून लढतात, की नागरदेवळेमधून याचा निर्णय अजून व्हायचा आहे. मात्र या गटात आ. कर्डिले यांचा प्रभाव आहे. तरीही मोकाटे त्यांना टक्कर देऊन निवडून आले आहेत. देहरे गटात ज्येष्ठ नेते दादा पाटील शेळके यांच्या प्रभावाखालील गट आहे. या गटात मनमाड रस्त्यालगतची गावे आहेत.
भूगोलानंतर राजकीय इतिहास बदलणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2016 01:10 IST