शिर्डी : शिर्डी-कोपरगाव रस्ता मृत्यूचा सापळा बनळा आहे. या रस्त्याचे काम प्रशासनाने तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी रविवारी रास्ता रोको करण्यासाठी एकत्रित जमलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांना शिर्डी पोलिसांनी मज्जाव करीत ताब्यात घेतले.
नगर-मनमाड रस्त्याने मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जात-येत असतात. या रस्त्यावर मोठ्या आकाराचे खड्डे पडल्याने दररोज अपघात होत आहेत. या रस्त्याने अनेकांचे बळी घेतले. अनेकांचे संसार उघडे पडले आहेत. याबाबत प्रशासनास वारंवार सांगूनही रस्त्याचे काम सुरू होत नसल्याने प्रशासनास जाग आणण्यासाठी सावळीविहीर फाटा येथे रविवारी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देत आंदोलनासाठी विद्यार्थी एकत्र आले होते. मात्र या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आंदोलकांना पोलिसांनी रस्त्यावर जाण्यास मज्जाव केला. यावेळी विद्यार्थ्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला. यावेळी नरेश सोनवणे, तुषार महाजन, कोमल राजपूत, सिद्धेश्वर सोमाणी, नरेश पवार, मयूर चोळके, चेतन कोते, कोमल राजपूत, जागृती वाकचौरे, धनश्री राजपूत, प्रतीक पावडे, अनिकेत सोमवंशी, गोविंद चौधरी, विशाल बोरडे, साईप्रसाद वाणी, वैभव चोळके, प्रफुल खपके, साक्षी भन्साळी, वैष्णवी बनकर, मृणाली शेळके, राहुल ठुबे, साक्षी खटाळे, शिवानी जपे, साईसंपदा बलाळू, कुणाल जमदाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.