पाथर्डी : गो हत्या बंद झालीच पाहिजे तसेच गो हत्या करणाऱ्यांना पोलीस पाठीशी घालीत असल्याच्या निषेधार्थ गोरक्षण समिती व अखिल भारतीय वारकरी मंडळाच्यावतीने मंगळवारी टाळ, मृदुंगाच्या गजरात पाथर्डी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी पाथर्डी शहर बंदचेही आयोजन करण्यात आले होते. नवीपेठेतून सुरुवात झालेल्या मोर्चात ह.भ.प.मुकुंदकाका जाटदेवळेकर, आदिनाथ महाराज आंधळे, तारकेश्वर गडाचे आदिनाथ महाराज शास्त्री, गोविंद महाराज, दीपक महाराज काळे, राम महाराज झिंझुर्के, मोहन महाराज सुडके, गुलाब महाराज घुले, गोरक्षक समितीचे अध्यक्ष मुकुंद गर्जे, उपाध्यक्ष अमोल गर्जे, ज्येष्ठ नेते अशोक गर्जे सहभागी झाले होते. मोर्चा पोलीस ठाण्यावर येताच तो अडविण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांच्या निषेधाच्या घोषणा देत तिसगाव येथे असलेल्या ११ गायींची सुटका करण्याची मागणी केली. आमचा प्रश्न सुटल्याशिवाय आम्ही कोणालाही बाहेर जावू देणार नाही, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनीे घेतल्यामुळे छगन भुजबळ यांच्या सभेच्या बंदोबस्तासाठी आलेले उपविभागीय अधिकारी सुनील पाटील पोलीस ठाण्यात अडकले. त्यांनी यावेळी पोलीस ठाण्यात महाराजांशी चर्चा केली, परंतु तोडगा निघाला नाही. वारकरी सांप्रदायाचे सर्व साधू, संत सुमारे तीन तास बसून होते.दरम्यान, नंतर उपविभागीय पोलीस अधिकारी व मोर्चेकरी यांच्यात चर्चा होऊन तिसगाव येथील ११ गायी सोडून देण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
पोलिसांच्या निषेधार्थ पाथर्डीत बंद,मोर्चा
By admin | Updated: October 7, 2014 23:42 IST