बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील शेकटे खुर्द येथील एका शेतकऱ्याने कांदा बियाणांपासून रोपे तयार करून त्यांची लागवड केली होती. परंतु, सदरील बियाणे बोगस निघाल्याने बहुतांश कांद्यांना डेंगळे फुटले आहेत. यामुळे संबंधित कंपनीवर कारवाई करून नुकसानभरपाई द्यावी, अशी लेखी तक्रार नुकसानग्रस्त शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
शेकटे खुर्द येथील भागवत अशोक मारकंडे या शेतकऱ्याने २२ मार्च २०२१ रोजी संबंधित विभागाकडे तक्रार दिलेली आहे. यामध्ये म्हटले आहे की, माझ्या गट नंबर १३/१ मधील दीड एकर क्षेत्रामध्ये उन्हाळी कांदा लागवड केली होती. यासाठी २१ ऑक्टोबर २०२० राेजी उसनवारी करून बीड जिल्ह्यातील मानूर (ता. शिरूर) येथील भूमी ॲग्रो ट्रेडर्समधून भूमिपुत्र सीड्स (मु.पो. शिवानी पिसा, ता. लोणार, जि. बुलडाणा) या कंपनीचे कांदा बियाणे खरेदी केले. सदरील बियाणांपासून रोपवाटिका करून कांदा रोपे तयार केली. या रोपांची तीन महिन्यांपूर्वी शेतात लागवड केली. त्यानंतर योग्यवेळी खतपाणी घालून मेहनत, मशागत केली. परंतु, सद्य:स्थितीला या प्लाॅटमधील जवळपास ६० टक्के कांद्यांना डेंगळे फुटले आहेत. याबाबत बियाणे कंपनीकडे तक्रार केली असता, संबंधिताने सदर कांदा प्लाॅटची पाहणी करून नुकसानीबाबत कंपनीकडे तक्रार नोंदवून आपणास भरपाई देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. परंतु, त्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांनी भरपाई देण्यास साफ नकार दिला. यामुळे मोठा आर्थिक फटका बसल्याने मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याने अखेर जिल्हा व तालुका कृषी विभागासह तहसीलदारांकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. सदरील बियाणांचे लाॅट क्रमांक, खरेदी पावती व फोटो तक्रार अर्जास जोडून त्यांनी संबंधित कंपनीवर कारवाई करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
---
संबंधित तक्रार अजून मी बघितली नाही. माझ्यापर्यंत आलेली नाही. मध्ये मी रजेवर होतो. हजर होऊन दोन दिवस झाले आहेत. आता बघतो.
-राहुल कदम,
तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती, शेवगाव
--
०१ बोधेगाव कांदा
शेकटे खुर्द येथील भागवत अशोक मारकंडे या शेतकऱ्याच्या दीड एकर क्षेत्रातील कांदा पिकास फुटलेले डेंगळे.