बोधेगाव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने ऊस लागवड करण्याऐवजी शास्त्रोक्त पद्धतीने करणे गरजेचे आहे. यामुळे एकरी उत्पन्न वाढण्यास मदत होते. तसेच उसाच्या परिपक्वतेनुसार ऊसतोड कार्यक्रम राबविल्याने साखर उतारा निश्चित वाढतो व साखर उत्पादनातही लक्षणीय वाढ होते, असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्सिट्यूटचे ऊस पिकांचे संशोधक अभ्यासक सुभाष जमदडे यांनी केले.
बोधेगाव (ता. शेवगाव) येथील श्री केदारेश्वर साखर कारखाना कार्यस्थळावर नुकतीच ऊस विकास परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केदारेश्वरचे अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे होते. संचालक सतीश गव्हाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे, प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार, के.डी. गर्जे, प्रवीण काळुसे, तीर्थराज घुंगरड, मच्छिंद्र जाधव, अभिमन्यू विखे, रामनाथ पालवे, तुकाराम वारे, भगवान सोनवणे, राजेंद्र केसभट, अंबादास दहिफळे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात अश्विनकुमार घोळवे यांनी ८६०३२ या जातीची लागवड करून जास्तीत जास्त एकरी उत्पादन मिळवणाऱ्या शेतकऱ्यांना कारखान्याच्या वतीने बक्षीस योजना जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच शेतकऱ्यांना उसासाठी आवश्यक असणारे औषध कारखान्याच्या कृषी सेवा केंद्रामार्फत उपलब्ध करून देण्यात येतील, असे सांगितले.
यावेळी सूत्रसंचालन माजी संचालक शरद सोनवणे यांनी केले. प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे यांनी आभार मानले.