विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या सात-आठ दिवसांपासून लस उपलब्ध झाली नाही. बुधवारी लसींचे २०० डोस आले आहेत. येथे होणारी गर्दी आवरताना कर्मचारी हैराण होत आहेत.
सध्या कोरोनाचा वाढता आलेख पाहता ४५ वर्षांवरील नागरिक लसीकरणासाठी गर्दी करत आहेत. अगदी २० किलोमीटर अंतरावरील नागरिक लस टोचून घेण्यासाठी आपला नंबर लागावा, यासाठी सकाळी ६ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर होतात. लस उपलब्ध नसेल अथवा नंबर लागला नाही, तर आल्यापावली परत जातात. यामध्ये वयोवृद्ध नागरिकांची मोठ्या प्रमाणात फरफट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
बुधवार (दि. २२) सकाळी ६ च्या सुमारास उपस्थित असणाऱ्या नागरिकांना उपलब्ध झालेल्या २०० लसींचे नंबर टोकण आरोग्य कर्मचाऱ्यांनी वाटप केले. मात्र, ज्या नागरिकांना लसीकरणासाठी नंबर टोकण मिळाले नाही, त्यांनी सकाळी १० वाजेपर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. काही उशिरा आलेल्या लोकांनी तर एवढ्या सकाळी नंबर वाटलेच कसे, असा प्रश्न उपस्थित करून आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना जाब विचारायला सुरुवात केली. कोरोनासारख्या महामारीत लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारे आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना लोकांना समजावून सांगत आपले काम चालू ठेवावे लागले.
--
प्राथमिक आरोग्य केंद्रात जेवढे कोरोना लसीचे डोस उपलब्ध होतील, ते नागरिकांना सुरळीतपणे देण्याचा सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. मात्र, लसींचे डोस मर्यादित स्वरूपात उपलब्ध होत असल्याने लोकांना समजावून सांगणे कठीण होते आहे. लोकांनी संयम बाळगण्याची गरज आहे.
-डॉ. जयदेवी राजेकर,
आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंपळगाव पिसा