संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी येथील नाथा लिंबा मेंगाळ (वय ६०) हे शनिवारी बोटा- ब्राद्मणवाडा मार्गे बोटा येथे पायी चालत किराणा आणण्यासाठी गेले होते. किराणा घेऊन घरी परतत असतना रात्री साडेआठ वाजलेच्या सुमारास बोटा- ब्राह्मणवाडा रस्त्यावर येथील काळाखडक वस्तीजवळ त्यांना पाठीमागून अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.
घटनेची माहिती समजताच त्यांच्या नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. खासगी रुग्णवाहिकेतून मेंगाळ यांना बोटा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, डोक्याला जास्त मार असल्याने त्यांना घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासले असता त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. मृतदेह शवविच्छेदनासाठी कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी अंकुश मेंगाळ यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकाॅन्सटेबल कैलास देशमुख करत आहे.