कुकाणा : देवगाव (ता.नेवासा) येथे मुळा उजवा कालव्याच्या मायनर एक वरील उपचारीचा मातीचा भराव वाहून गेला. यामुळे पाटचारी फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया गेले. चारीचे पाणी शेतात घुसल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुळा उजवा कालव्यातून आर्वतन सुरु असताना मंगळवार (दि.२९) रोजी सायंकाळी या चारीला भगदाड पडले. कुकाणा-घोडेगाव मार्गावर देवगाव शिवारातील ओढे-नाले खळखळून वाहू लागले. पाटपाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या क्षेत्रातील पिके यामुळे धोक्यात येण्याची शक्यता आहे. कुकाणा चिलेखनवाडी, जेऊर हैबती, देवगाव, देवसडे, भायगाव या शिवारांसाठी ही पाटचारी आहे.दरम्यान पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत पाटचारी बुजविण्याचे काम सुरू होते. चारीला छिद्र पडल्याने ही चारी फुटल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येत आहे.
देवगाव येथे पाटचारी फुटली; लाखो लिटर पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 15:09 IST