अण्णा नवथर, अहमदनगरजिल्ह्यातील गोदावरी, मुळा, प्रवरा, घोड आणि भीमा नदीतून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांकडून गेल्या पाच वर्षांत ४४ महसूल कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले आहेत़ सर्वाधिक तलाठी व मंडल अधिकाऱ्यांवर हल्ले झाले आहेत़ त्यामुळे वाळूच्या कामातून मुक्त करण्याची मागणी तलाठी व मंडल अधिकाऱ्यांकडून जोरकसपणे पुढे येत आहे़ जिल्ह्यातून गोदावरी, मुळा, प्रवरा, घोड आणि भीमा नदी जाते़ नदीपात्रातील वाळू पट्टयांचे रितसर लिलाव होत असतात़ मात्र लिलावाकडे ठेकेदार पाठ फिरवितात़ रितसर वाळू विकत न घेता अवैधरित्या वाळूचा उपसा करणाऱ्या टोळ्या जिल्ह्यात सक्रिय आहेत़ प्रशासनाकडून वाळूमाफियांविरोधात ठोस मोहीम उघडली जात नाही़ त्यामुळे त्यांची मुजोरी वाढली आहे़ कारवाईसाठी आलेल्या पथकावरच त्यांच्याकडून हल्ले होतात़ राहुरी तालुक्यातील मुळा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या पथकावरच प्राणघातक हल्ला झाला़ वाळूमाफियांनी अंधाराचा फायदा घेऊन गलोलीव्दारे पथकाच्या दिशेने दगड भिरकावले़ त्यात पथकातील कर्मचारी गंभीर जखमी झाले़ एकाच महिन्यात अशा तीन वेगवेगळ्या घटना घडल्या़ त्यामध्ये गाव पातळीवर काम करणारे तलाठी व मंडलाधिकारी जबर जखमी झाले़ कर्मचाऱ्यांना मारहाण करणारे वाळूमाफिया मात्र मोकाट आहेत़ काही ठिकाणी तर अंगावर वाहने घालण्याचा थरार घडला़ पण, काहींनी भितीपोटी तक्रार दिली नाही़ त्यामुळे मारहाणीच्या घटना समोर आल्या नाहीत़ अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी अनेक मोहिमा प्रशासनाने आखल्या़ मात्र त्या यशस्वी झाल्या नाहीत़ या मोहिमा यशस्वी न होण्यामागे अनेक कारणे आहेत़ त्याचा शोध घेण्याची गरज आहे़ सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे गाव पातळीवर काम करणाऱ्या तलाठी व मंडल अधिकाऱ्यांच्या संघटनांनी हे काम काढून घेण्याची मागणी केली आहे़ कर्मचाऱ्यांवरील होणारे हल्ले, हा प्रकार गंभीर आहे़ याची प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची गरज आहे, असा सूर संघटनाकडून आळवला जात आहे़तलाठी व मंडलाधिकाऱ्यांकडून काढून घेण्याची मागणी महसूलमंत्र्यांकडे संघटनेने केली आहे. त्यांनी याबाबत विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.-ज्ञानदेव भुजबळ, जिल्हाध्यक्ष, तलाठी महासंघ.
पाच वर्षांत ४४ कर्मचाऱ्यांवर हल्ले
By admin | Updated: May 26, 2016 23:57 IST