निकृष्ट काम : कळंब परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता, वंडलीतील शेताला तळ्याचे स्वरूपकळंब : बेंबळाच्या कालव्याचे काम अर्धवट व निकृष्ट करण्यात आल्याने तालुक्यातील अनेक गावात पाणी रस्त्यावरुन वाहात आहे. काहींच्या शेतात पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. यापूर्वी आष्टा वितरिका फुटून तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले होते. आजही हिच स्थिती अनेक गावात कायम आहे. वंडली येथील क्रिष्णा भाऊराव ओंकार यांचे तीन एकर शेत पाण्याखाली आले आहे. त्यांनी उसणवार करून ७० ते ८० हजार रुपये शेतीत खर्ची घातले. परंतु आता एक रुपयाही शेतीत मिळते की नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ते चिंताग्रस्त आहे. परिसरातील माटेगाव, सावरगाव, मंगरुळ, कळसपूर, परसोडी यासह अनेक गावातील शेतकऱ्यांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. जमिनीत कायम ओलावा असल्यामुळे शेकडो एकर जमीन वांझोटी ठरली आहे. त्यामुळे कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. माटेगाव येथून बेंबळा प्रकल्पाची आष्टा वितरिका गेलेली आहे. ही वितरिका सिमेंट लाईनिंगची तयार करा, अशी मागणी अनेक वर्षापासूनची आहे. यासाठी अनेकदा निवेदन व आंदोलनही करण्यात आले. परंतु थातुरमातूर कामाव्यतिरिक्त काम पुढे सरकले नाही. बेंबळाचे पाणी चुकीच्या कामामुळे शेतापर्यंत पोहोचत नाही. दुसरीकडे याच प्रकल्पाच्या पाण्याने नली-नाले दुथडी भरून वाहतात. एका तपापासूनचे शेतकऱ्यांचे स्वप्न असणाऱ्या बेंबळा प्रकल्पाचे पाणी अजूनही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचले नाही. यापूर्वी अनेकदा कालव्याद्वारे पाणी वाटपाची चाचपणी घेण्यात आली़ चाचणीनंतर प्रकल्पाच्या कामाचे पितळ उघडे पडले़ तांत्रिक चुकांमुळे शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचे स्वप्न धुळीस मिळते की काय, अशी स्थिती आहे़ त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची या प्रकल्पामुळे घोर निराशा झाली आहे़ चुकीचा सर्वेमुळे अनेक शेतकऱ्यांना पाणी मिळणे कठीण झाले. बहुतांश ठिकाणी कालव्याचे पाणी खाली व शेतजमीन वर, अशी स्थिती आहे़ अशा स्थितीत पाणी कसे घ्यावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ परंतु याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. (तालुका प्रतिनिधी)
पारनेर शहरानजीक चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2016 00:45 IST