अहमदनगर : ऑक्सिजन टँकर प्रकल्पाच्या स्थळावरून भरून तो जिल्हा रुग्णालयात येईपर्यंत टँकरसोबत राहण्याची जबाबदारी असलेले सुपा (ता. पारनेर) येथील मंडलाधिकारी शिवाजी तुकाराम शिंदे यांनी त्यांची जबाबदारी पार पाडण्यात हलगर्जीपणा केला. जिल्हाधिकारी यांनी केलेल्या पाहणीत टँकरचालक चाकण येथे टँकर थांबवून झोपले होते, तर मंडलाधिकारी घरीच असल्याचे निदर्शनास आले. या हलगर्जीपणामुळे मंडलाधिकारी शिंदे यांना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे.
शिवाजी शिंदे हे पारनेर तहसील कार्यालयांतर्गत महसूल विभागात अव्वल कारकून असून सुपा येथे अतिरिक्त मंडलाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लिक्विड ऑक्सिजन टँकर चाकण, तळोजा, मुरबाड येथील ऑक्सिजन उत्पादक युनिटपासून अहमदनगर जिल्हा रुग्णालय, रिफिलर प्लांटपर्यंत विनाअडथळा पोहोचविणे यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे यांना सोमवार, गुरुवार आणि रविवार या तिन्ही दिवशी टँकर आणि पथकासोबत हजर राहण्याच्या सूचना आहेत. रविवारी (दि. २) रोजी लिंडे एअर प्रोडक्ट्स युनिटवरून लिक्विड मेडिकल ऑक्सिजन भरून आणण्याची जबाबदारी दिली होती. सायंकाळी टँकर ताब्यात घेऊन तो उत्पादक युनिटकडे नेण्याची जबाबदारी होती. मात्र तशी कृती त्यांनी केली नाही.
२ मेच्या रात्री १०.३० वाजता शिंदे यांनी समन्वय अधिकाऱ्यांना मेसेज करून ऑक्सिजन टँकरच्या चालकाला झोप येत असल्याने तो चाकण येथे विश्रांती घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर समन्वय अधिकाऱ्यांनी रात्री अनेक वेळा टँकरचालक व शिंदे यांच्याशी संपर्क केला, मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने टँकरबाबत सद्य:स्थिती लक्षात घेता आली नाही. पहाटे ४.३० वाजता संपर्क झाल्यानंतर शिंदे यांनी आपण घरी असल्याचे सांगितले. त्यांच्या हलगर्जीपणामुळे ऑक्सिजन टँकर वेळेवर जिल्हा रुग्णालयात पोहोचले नाही. आपत्कालीन परिस्थितीमध्ये अक्षम्य हलगर्जीपणा करून कर्तव्यात कसूर केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे शासन सेवेतून निलंबन केले आहे. निलंबनाच्या कालावधीत त्यांना निर्वाह भत्ता देण्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच त्यांचे यापुढचे मुख्यालय श्रीगोंदा येथील तहसील कार्यालय राहणार असून परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेशात बजावण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत हलगर्जीपणा केल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली ही पहिलीच कारवाई ठरली आहे.