श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील ऊस फडात साखर कारखान्यांनी ऊस तोड सुरू केली आहे़ मात्र उसाचा पहिला हप्ता गुलदस्त्यात ठेवला आहे. उसाला पहिला हप्ता २ हजार २०० रुपयांनी द्यावा अन्यथा ५ नोव्हेंबरपासून ऊसतोड बंद करण्याचा इशारा कृषीवल ऊस उत्पादक शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष गणपतराव परकाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे.परकाळे म्हणाले की, सन २०१३-१४ मध्ये गाळप झालेल्या प्रति टनास शेतकऱ्यांना जादा भाव देण्यासाठी केंद्र शासनाने ३५० रुपये अनुदान दिले़ मात्र हे अनुदान साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना न देता अनुदानाची वेगळ्या पद्धतीने विल्हेवाट लावली आहे़ त्यामुळे २ हजार १०० रुपयांच्या पुढे शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे.केंद्र शासनाने जाहीर केलेल्या एफ.आर.पी. उसाला २ हजार ३०० रुपयांनी भाव देणे बंधनकारक आहे. खत, बियाणे, मजुरी व मशागतीचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे उसाची शेती हा भांडवली व्यवसाय झाला आहे़ त्यामुळे उसाला कारखान्यांनी प्रति टन ३ हजारांनी भाव देणे बंधनकारक आहे़श्रीगोंद्यात ३० ते ३१ लाख मेट्रीक टन ऊस आहे. श्रीगोंदा, कुकडी, साईकृपा, दौंड शुगर, बारामती अॅग्रो, अंबालिका आणि कारखान्याच्या ऊस तोडणी टोळ्या दाखल झाल्या आहे़ साखर कारखान्यांनी उसाला दर कमी दिला तर शेतकऱ्यांचा कोट्यावधीचा तोडा होणार आहे. तालुक्यातील नेते राजकारणात समोरासमोर येतात मात्र उसाच्या भावावर फिक्सींग करतात हा अनुभव सर्वांच्या जमेला आहे. (तालुका प्रतिनिधी)
अन्यथा ऊस तोडणी बंद
By admin | Updated: October 29, 2014 23:58 IST