शिर्डी शहराचे अर्थकारण साईबाबा मंदिरावर अवलंबून आहे. कोरोना कालावधीत मंदिर बंद ठेवणे योग्य होते; परंतु आता बाकी सर्व आस्थापना सुरू आहेत, इतर व्यवसाय सुरू आहेत, मग मंदिरच बंद का, असा सवाल उपस्थित करत शासनाकडून आता सक्तीने मंजुरी घेण्याची वेळ आली असल्याचे मत कुमावत समाज विकास सेवा संस्थेचे राज्य उपाध्यक्ष संजय परदेशी यांनी व्यक्त केले आहे.
साई मंदिर उघडण्याची मागणी सर्व कुमावत बांधवांनी समाजमाध्यमातून लावून धरा. कारण उसनवारी किती दिवस करायची, कुणी उसने द्यायलाही तयार नाही. उपासमार सुरू झाल्याने आता लोकांचा संयम संपला आहे, तेव्हा अराजकता निर्माण होण्यापूर्वी शासनाने गंभीर दखल घेऊन साई मंदिर सुरू करावे, कारण त्यावर अनेकांचे रोजगार अवलंबून आहेत. या पार्श्वभूमीवर उपाशी मरण्यापेक्षा कुमावत समाजाने मंदिर उघडण्यासाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.
संजय परदेशी यांनी केलेल्या आवाहनाला समाजाचे जिल्हाध्यक्ष रावजी परदेशी, ज्येष्ठ कुमावत नेते गोरखराव परदेशी, नंदूलाल परदेशी, शिवसेना नेते सुनील परदेशी, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा स्वाती परदेशी, कुमावत समाजाचे शहराध्यक्ष लखन बेलदार, गणेश परदेशी, गणेश परदेशी, शिवाजी बेलदार, विशाल परदेशी आदींनी पाठिंबा व्यक्त केला आहे.