दिवसेंदिवस कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध लागू करत २३ एप्रिलपासून प्रवासासाठी ई-पासची सक्ती केली आहे. अत्यावश्यक कारण असेल तरच पोलिसांकडून ई-पास देण्यात येत आहे. १५ हजार अर्जांपैकी पोलिसांनी छाननी करून त्यातील ५ हजार जणांना ई-पास दिले असून, १ हजार अर्ज प्रलंबित आहेत. प्रवासासाठी अत्यावश्यक कारण नसणे, गरजेचे कागदपत्र न जोडलेले अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. शासनाने आणखी पंधरा दिवस निर्बंध वाढविल्याने गेल्या दोन दिवसांत ई-पाससाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दिवसाला बाराशे ते तेराशे अर्ज सध्या पोलिसांकडे येत आहेत.
.........
ई-पाससाठी आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत
ई-पाससाठी पोलीस संकेतस्थळावर दररोज मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त होत आहेत. मात्र, बहुतांशी अर्जदार केवळ माहिती भरून अर्ज सबमिट करतात. त्यासाठी अत्यावश्यक कारण काय आहे हे नमूद करत नाहीत, तसेच अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रेही अपलोड करत नाहीत, त्यामुळे अशा पासला मंजुरी देता येत नाही. नागरिकांनी व्यवस्थित कारण नमूद करून गरजेची कागदपत्रे डाऊनलोड करावीत, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रतीक कोळी यांनी केले आहे.
..........
चोवीस तासांच्या आत पास देण्याचा प्रयत्न
नागरिकांना ई-पास देण्याची जबाबदारी सायबर पोलिसांकडे देण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी दिवस-रात्र काम करून अर्जांची तपासणी करून नागरिकांना पास देत आहेत. १२ ते २४ तासांच्या आत जास्तीत जास्त नागरिकांना पास दिले जात असल्याचे उपनिरीक्षक कोळी यांनी सांगितले.
.......
५ हजार ई-पास दिले
१ हजार अर्ज प्रलंबित
..........
असा करावा अर्ज
ई-पाससाठी http://covid19.mhpolice.in या वेबसाइटवर जाऊन स्वतःची माहिती, फोटो व ज्या कामासाठी घराच्या बाहेर जायचे आहे त्या कारणाशी संबंधित असलेली कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. माहिती व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्जदारास एक सांकेतिक क्रमांक मिळतो. तो सांकेतिक क्रमांक पुन्हा वेबसाइटवर टाकल्यानंतर हा ई-पास थेट डाऊनलोड करून घेता येईल.