अहमदनगर : नगर शहरात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयतींच्या सात ते आठ मिरवणुका निघतात त्या ऐवजी यंदा एकच मिरवणूक काढण्यात येईल, त्याला सर्व मंडळांनी सहमती दर्शविली आहे़ एकतेचा यानिमित्ताने संदेश जाईल अशी अपेक्षा रिपाइंचे प्रदेश सरचिटणीस अशोक गायकवाड यांनी व्यक्त केली़ मार्च-एप्रिलमध्ये सण-उत्सवांची रेलचेल आहे. होळी, रंगपंचमी, तिथीनुसार शिवजयंती, गुडफ्रायडे, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी आदी सणांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली. या बैठकीला प्रांताधिकारी वामन कदम, पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे, तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी अविनाश मोरे, कोतवालीचे अधिकारी सोमनाथ मालकर यांच्यासह समितीचे सदस्य, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी उपअधीक्षक बनसोडे म्हणाले, मिरवणूक, उत्सवांमध्ये नागरिकांनी घडणाऱ्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवावी. कुठे गडबड होण्याची शक्यता दिसल्यास याबाबत पोलिसांना सूचना द्याव्यात. कोणत्याही प्रकारे अनुचित घटनांना पायबंद घालता आला पाहिजे. नगर हे संवेदनशील शहर म्हणून ओळखले जात आहे. त्यामुळे विकास करण्यासाठी स्पर्धा करावी, यासाठी कोणीही नगरमध्ये फिरकत नाही. नगरची ही ओळख पुसण्यासाठी पोलीस बळ नव्हे तर नागरिकांच्या सजगतेची गरज आहे. बंगल्याचा रुबाब वॉचमन नव्हे तर मालकच व्यवस्थितपणे ठेवू शकतो. सण-उत्सवासोबतच दुष्काळ स्थितीमुळे आंदोलनांची संख्याही वाढणार आहे. तिथेही कायदा-सुव्यवस्था ढासळणार नाही, याबाबत पोलिसांना सतर्क राहावे लागणार आहे. व्यक्तिगत मैत्रीमध्ये जात कधीच पाहिली जात नाही, मात्र सण-उत्सवामध्ये जातीच्या नावावर एकमेकांची डोकी फोडली जातात. तरुणांची माथी भडकवून देण्याचे काम अप्रत्यक्षपणे केले जात असल्याने दूध पोळायची वेळ येवू देऊ नये, असे आवाहन बनसोडे यांनी केले. या बैठकीत अशोक गायकवाड, उबेद शेख, संजय झिंजे, नीलिमा गायकवाड आदींनी विचार व्यक्त केले.(प्रतिनिधी)जयंतीला हवी सुट्टीतिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याचे शिवसेनेचे धोरण आहे. सध्या राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे तिथीप्रमाणे येणाऱ्या शिवजयंतीला सुट्टी असावी, असे उबेद शेख यांनी सूचना मांडली याबाबत अशोक गायकवाड हे स्पष्टीकरण देत असताना त्यांच्या विधानाला भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नरेंद्र कुलकर्णी यांनी आक्षेप घेतला. सुट्टीबाबत तुम्ही सांगू नका. इथे भाषणबाजी करू नका, असे कुलकर्णी यांनी बजावले. त्यावेळी गायकवाड यांनी त्यांना सत्ता आपलीच आहे,याची आठवण करून दिली. धोरणे ठरविण्यासाठी लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी जे ठरविले, त्याची अंमलबजावणी करताना शांतता राखावी असे बनसोडे यांनी स्पष्ट केले़
आंबेडकर जयंतीची शहरात एकच मिरवणूक
By admin | Updated: March 23, 2016 00:15 IST