अहमदनगर : ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. राज्य सरकारकडून शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम राबविला जात आहे. यात प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकाने २०० गुणांची प्रश्नपत्रिका सोडवून त्यात नुसार आपल्या शाळेचा दर्जा निश्चित करण्यास सांगण्यात आलेले आहे. जिल्ह्यात अशा मूल्यांकनात अ श्रेणीत अवघ्या ५३ शाळा आल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणाची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळेची नियमित तपासणी करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकासासाठी समृध्दी प्रकल्प राबविण्यात येत आहे. शाळेच्या स्वयंमूल्यमापनासाठी २०० गुणाची प्रश्न पत्रिका तयार करण्यात आली असून त्यात शालेय व्यवस्थापनासाठी ७५ गुण, लोकसहभागासाठी १२ गुण, शैक्षणिक संधी समानतेसाठी १३ गुण, शैक्षणिक गुणवत्तेसाठी १०० गुण ठेवण्यात आलेले आहेत.यात ज्या शाळेला ९० ते १०० गुण मिळतील तिला अ, ८० ते ८९ गुण मिळविणाऱ्या शाळेला ब, ६० ते ७९ गुणासाठी क, ४० ते ५९ गुणासाठी ड आणि शून्य ते ३९ गुणासाठी इ श्रेणी तयार करण्यात आलेली आहे. दरवर्षी साधारण सप्टेंंबर महिन्यांत हे मूल्यमापन होत असून त्यानुसार शाळेचा दर्जा निश्चित करण्यात येत आहे. प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकाने स्वत २०० गुणांची प्रश्नपत्रिका सोडवून त्याव्दारे आपल्या शाळेचा दर्जा ठरविण्यास सरकारने सुचविले आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी चावडी वाचनाच्या ऐवजी शाळा व्यवस्थापन समिती समोर विद्यार्थी व शिक्षकांचे कथा, काव्य वाचन घेण्यात यावे, तसेच यावेळी प्रश्न मंजुषेचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा. शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू, फळे यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्याच्या सूचना सरकारच्यावतीने देण्यात आलेल्या आहेत. (प्रतिनिधी)