लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद होण्याच्या मार्गावर आहेत. बाजार समित्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केला असून, घोडेगाव येथील कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगर येथील निम्म्याहून अधिक व्यापाऱ्यांनी लिलाव करण्यास नकार कळविला आहे. त्यात यंदाचा कांदा साठविण्यायोग्य नसल्याने कांद्याचे करायचे काय, असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर आहे.
जिल्ह्यात सध्या सर्वत्र उन्हाळी कांदा काढणीचे काम सुरू आहे. मागील आठवड्यात नगर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याची आवक ४० हजारांवर पोहोचली होती. मात्र लॉकडाऊन करण्यात आल्याने हॉटेल, वडापाव, भजे आदी हॉटेल बंद झाली. त्यामुळे कांद्याची आवक कमालीची घटली. कांद्याचे भाव पडले असून, सध्या कांदा प्रति क्विंटल ८०० ते १००० रुपये विकला जात आहे. भाव पडल्याने आवक कमी झाली. त्यात बाजार समित्यांमध्ये शेतीमालाचे लिलाव करणारे व्यापारी, वाहतूक करणारे हमाल, आडत्यांकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे कांद्याचा मोठा बाजार भरतो. तेथे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे येत्या शनिवारी घोडेगाव येथे कांदा लिलाव होणार नाही. नगर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा खरेदी करणारे १०४ व्यापारी आहेत. त्यापैकी १५ व्यापाऱ्यांनीच लिलाव करण्याची तयारी दर्शविली आहे. उर्वरित व्यापाऱ्यांनी लिलाव करण्यास नकार दिला आहे. राहुरी व राहता येथील कांदा लिलाव सुरू ठेवण्यात आल्याचे सचिवांकडून सांगण्यात आले.
.......
कुठे किती आवक
नगर- ३० हजार क्विंटल
घोडेगाव- २७ ते २८ हजार क्विंटल
राहुरी- ४ ते ५ हजार क्विंटल
राहाता- ६ ते ८ हजार क्विंटल
.....
कांदा खरेदी करणारे व्यापारी
नगर- १०४, घोडेगाव-३२, राहुरी- ४०, राहाता-२५
.....
कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
कोरोनाचे रुग्ण वाढत असताना बाजार समित्यांमध्ये भाजीपाला, फळे, कांदा घेऊन येणारे शेतकरी व खरेदी करणाऱ्यांची गर्दी होते. गर्दीतून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. रुग्णांना बेड मिळत नाहीत. सर्वत्र भयावह स्थिती असल्याने बाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे.
.....
लस देण्यास आरोग्य यंत्रणेचा नकार
जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांमध्ये साधारण १० हजार कर्मचारी काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांचा शेतकरी, व्यापारी, हमाल आदींशी संपर्क येतो. बहुतांश कर्मचारी ४० वर्षांखालील असल्याने या कर्मचाऱ्यांना लस दिली गेली नाही. बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना लस देण्यासाठी प्रशासनाकडून पाठपुरवा सुरू आहे. परंतु, प्रशासनाकडून या कर्मचाऱ्यांना लस दिली गेली नसल्याचे सांगण्यात आले.
....