श्रीगोंदा : २० ऑगस्ट २०२० रोजी विसापूर फाट्याजवळ (ता. श्रीगोंदा) झालेल्या चौघांच्या हत्याकांड प्रकरणातील जळगाव येथील आरोपी आशाबाई सोनवणे या महिलेस न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अन्य, तीन आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला नव्हता.
सुरेगाव येथील पाच ते सहा जणांनी स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून जळगाव येथील चौघांवर विसापूर फाट्याजवळ हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावर स्वत:च बचाव करण्यासाठी जळगाव येथील आरोपींनी आदिवासी आरोपीवर प्रतिहल्ला केला. त्यात नाथिक्या चव्हाण, श्रीधर कुंजा चव्हाण, नागेश कुंजा चव्हाण, लिंब्या हाबऱ्या काळे
हे ठार झाले होते. हे प्रकरण राज्यभर गाजले.
याप्रकरणी नरेश सोनवणे, प्रेमराज पाटील, कल्पना सपकाळ, आशाबाई सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. जामिनाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. न्यायालयाने आशाबाई सोनवणे या महिला आरोपीस जामीन मंजूर केला. आरोपींच्या बाजूने ॲड. राहुल करपे, ॲड. अनिकेत भोसले यांनी काम पाहिले.