चंद्रकांत दादांनी नगरमध्ये स्वबळाचा नारा देताच भाजपच्या केडरमध्ये खसखस पिकली. दादा असं कसं बोलू शकतात? अशी शंका अभ्यासू कार्यकर्त्यांनी उपस्थित केली. मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेबरोबर युती असूनसुद्धा आपण शतप्रतिशत भाजप म्हणत होतो. दस्तुरखुद्द अमित शहांनीच ते अभियान राबवलं होतं. आता वेळ आलीय म्हणत कार्यकर्त्यांना एकजुटीचं आवाहनही त्यावेळी अमितभाईंनी केलं होतं. अन् आता तर शिवसेनाही आपल्यासोबत नाहीये. त्यामुळे तसंही आपलं आपोआपच स्वबळ झालंय. स्वबळाला पर्यायच नाही. आता खऱ्या अर्थाने आपण शतप्रतिशत म्हणूयात, असं काही कार्यकर्ते आपापसात कुजबुजले. एक जणाने लगेचच चंद्रकांतदादांना खालून चिठ्ठी पाठविली. त्यात काय लिहिलं होतं, ते समजलं नाही. पण, हा विषय खासगीत बोलूया, असा दादांनी त्या कार्यकर्त्याला पाठविलेला निरोप तेव्हढा कळला.
शतप्रतिशत की स्वबळ.. ते खासगीत बोलूया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:20 IST