नेवासा : मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यांनी नेवासा तालुक्यातील महत्त्वाच्या सर्व रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. लवकरच या रस्त्यांच्या कामाला प्रारंभ होणार आहे.
नेवासा तालुक्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली होती. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने तालुक्यातील नागरिकांनी प्रामुख्याने या प्रश्नाकडे तत्कालीन अपक्ष उमेदवार गडाख यांचे लक्ष वेधून रस्त्यावरील खड्ड्यांच्या साडेसातीतून सुटका करण्याचे साकडे घातले होते. त्यावेळी हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे आश्वासन गडाख यांनी दिले होते. मात्र, कोविडच्या पार्श्वभूमीवर देशभरात पाळण्यात आलेल्या अभूतपूर्व लॉकडाऊनमुळे हे काम करण्यात अडचणी निर्माण झाल्या. मात्र, लॉकडाऊन शिथिल होताच मंत्री गडाख यांनी तालुक्यातील सर्व महत्त्वाच्या रस्ता कामांचा आराखडा बनविण्याचे आदेश देऊन त्यास प्रशासकीय मंजुरीही मिळविली होती. त्यानुसार त्यांनी सर्व महत्त्वाच्या रस्ता कामांसाठी शंभर कोटींचा निधी मिळविला.
चौकट..
या रस्त्यांची होणार कामे..
५६ कोटी ५२ लाख रुपये श्रीरामपूर-शेवगाव राज्य मार्गावरील पाचेगाव फाटा ते कुकाणादरम्यानच्या ३३.५ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी मिळाले आहेत. सोनई ते घोडेगाव रस्ता ६ कोटी ४० लाख, खडका फाटा ते तुळजाईवाडी रस्ता २ कोटी ५० लाख, सलाबतपूर-शिरसगाव ते गोपाळपूर-खामगाव रस्ता २ कोटी ५० लाख, तामसवाडी-धनगरवाडी ते खुपटी रस्ता कामासाठी २ कोटी, मोरेचिंचोरे ते सोनई रस्ता २ कोटी ५० लाख, वडाळा बहिरोबा ते रांजणगाव रस्ता २ कोटी ३० लाख, कारेगाव ते सौंदाळा रस्ता २ कोटी, सोनई अर्बन बँक ते विवेकानंद चौक रस्ता काँक्रिटीकरण- ८८ लाख, दहीगाव-कुकाणा मार्गावरील शेवगाव हद्द ते कुकाणा रस्ता १ कोटी ७६ लाख, जळके बुद्रुक ते गोगलगाव रस्ता- ५० लाख, नेवासा-हंडीनिमगाव ते भानसहिवरा रस्ता २ कोटी ४० लाख, भानसहिवरे ते रांजणगावदेवी रस्ता २ कोटी ५० लाख, रांजणगावदेवी ते घोडेगाव-कुकाणा रस्ता २ कोटी ५० लाख, करजगाव ते देवखिळे वस्ती रस्ता २ कोटी ४० लाख, माका ते पाचुंदा रस्ता २ कोटी १० लाख, चांदा ते रस्तापूर रस्ता १ कोटी २६ लाख, सोनई-शनिशिंगणापूर, चांदा रस्ता सुधारणा करणे १ कोटी २० लाख.