अहमदनगर : जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या एका ६७ वर्षीय वृद्धाचा कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. दरम्यान मयताच्या नातेवाइकांनी रुग्णालयात धाव घेतल्याने तातडीने ऑक्सिजनची टाकी बदलण्यात आली. नातेवाइकांच्या सतर्कतेमुळे इतर दोघांचा जीव वाचला.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड वॉर्ड क्रमांक-६ मधील रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करणारी टाकी ३ वाजून ३५ मिनिटांनी संपली. ही टाकी संपण्याआधीच नवीन टाकी जोडणे अपेक्षित होते. परंतु, अर्धातास उलटूनही कर्मचाऱ्यांनी ऑक्सिजन टाकी बदलली नाही. त्यामुळे ऑक्सिजन न मिळाल्याने एका आजोबांचा मृत्यू झाल्याचा दावा नातेवाइकांनी केला. ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते विशाल लोळगे व इतरांनी रुग्णालयात धाव घेतली. ऑक्सिजन पुरवठा बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी इतर रुग्णांकडे विचारणा केली. इतर रुग्णांनीदेखील ऑक्सिजन १५ ते २० मिनिटांपासून बंद असल्याचे सांगितले. त्यामुळे लोळगे यांच्यासह आजोबाच्या नातेवाइकांनीही टाकी बदलण्यासाठी कर्मचाऱ्याचा शोध घेतला. मात्र वॉर्ड क्रमांक ६ मधील कर्मचारी बाहेर गेल्याचे त्यांना सांगण्यात आले. हा सर्व घटनाक्रम लोळगे यांनी मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद केला. ऑक्सिजन पुरवठा बंद असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर रुग्णालयात एकच धावपळ उडाली. कर्मचाऱ्यांचा शाेध घेऊन तातडीने टाकी बदलण्यात आली. परंतु, तोपर्यंत आजोबांचा मृत्यू झाला होता. इतर दोघांना यामुळे त्रास होऊ लागला होता. ऑक्सिजन पूर्ववत झाल्याने त्यांचे प्राण वाचले.
......
जिल्हा रुग्णालयात जिल्हाभरातून रुग्ण दाखल होत आहेत. परंतु, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा रुग्णाच्या नातेवाइकांनी रविवारी पर्दाफाश केला. ऑक्सिजन उपलब्ध असूनही केवळ टाकी न बदलल्याने एकाला जीव गमवावा लागला. नातेवाइकांनी थेट कोविड वॉर्डात जाऊन या घटनेचे चित्रिकरण केले असून, हा संपूर्ण प्रकार सर्वसामान्य रुग्णांच्या जिवावर बेतणारा असाच आहे. त्यामुळे याबाबत तातडीने कारवाई करावी.
-विशाल लोळगे, सामाजिक कार्यकर्ते
....
उपचारासाठी रुग्ण दिवसभर उभे
कोरोनाचा रुग्ण व त्यांचे नातेवाईक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत होता. म्हणून नातेवाइकांनी तातडीने उपचार सुरू करण्याची मागणी केली. परंतु, दिवसभर थांबूनही उपचार तर दूरच, पण साधी ऑक्सिजन पातळीदेखील कर्मचाऱ्यांनी मोजली नाही. रुग्ण व त्यांचे नातेवाईक संध्याकाळपर्यंत रुग्णालयाच्या दारात उभे होते, अशी माहिती रुग्णाच्या नातेवाइकाने दिली.