भाळवणी (जि. अहमदनगर) : नगर- कल्याण महामार्गावर भाळवणी (ता. पारनेर) येथे गोरेगाव चौकात खडी वाहतूक करणारा डंपर, ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर, छोटा टेम्पो या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एक जण ठार, तर दोघे जण जखमी झाले. ही घटना शनिवारी मध्यरात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान घडली.
सुदाम डेरे (३८, रा. पाडळी आळे, ता. पारनेर) असे मृताचे नाव आहे. संतोष नाथा डेरे (३७), किसन लक्ष्मण डेरे (३३, दोघेही रा. पाडळी आळे), अशी जखमींची नावे आहेत. पाडळी आळे (ता. पारनेर) येथील सुदाम डेरे, संतोष डेरे, किसन डेरे हे तीन शेतकरी भाळवणी येथील वजनकाट्यावर उसाचे वजन करण्यासाठी कल्याण- नगर महामार्गावरून ट्रॅक्टर घेऊन येत होते. भाळवणीजवळ ते आले असता पाठीमागून डंपर (एमएच- २० डीई- ४७२६) येत होता, तर याचवेळी एक छोटा टेम्पो (एमएच- ०५ ईएल- ०३५७) कल्याणच्या दिशेने जात होता. भरधाव डंपरने ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे समोरून येणाऱ्या टेम्पोला ट्रॅक्टर व डंपरची धडक बसली. यामध्ये ट्रॅक्टरचा अक्षरश: चक्काचूर झाला.