अहमदनगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा येत्या रविवारी (दि. २१) जिल्ह्यातील ५१ केंद्रांवर होणार आहे. या केंद्रावर १५ हजार ८४७ उमेदवार परीक्षा देणार आहेत, अशी माहिती परीक्षेचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांनी दिली. परीक्षेसाठी १६३८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांची कोरोना चाचणीही सुरू करण्यात आली आहे.
लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी १३ समन्वय अधिकारी, २ भरारी पथके, ५१ उपकेंद्रप्रमुख, ५१ सहायक,१६६ पर्यवेक्षक, ९७ सहायक कर्मचारी,१५ भरारी पथके, ६६१ समादेशक, ५१, लिपिक, ५१ केअर टेकर,४५ बेलमन, २०२ शिपाई, १६६ पाणीवाटप कर्मचारी, ६७ वाहनचालक अशा १६३८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ही परीक्षा रविवारी सकाळी १० ते २ आणि ३ ते ५ अशा दोन सत्रांत होणार आहे. नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना सकाळी ८.३० वाजता परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना एकदा परीक्षा केंद्रात आले तर पुन्हा परीक्षा केंद्राबाहेर जाता येणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.