अहमदनगर मंडळातील अकोले उपविभागांतर्गत उच्च दाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) टप्पा दोनमधून खिरविरे येथे ३३/११ केव्ही उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. या उपकेंद्रामुळे परिसरातील अनेक गावांमधील प्रामुख्याने घरगुती व इतर वर्गवारीच्या ग्राहकांसह शेतकऱ्यांच्या कृषिपंपाच्या वीजजोडण्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. मात्र, या उपकेंद्रासाठी प्रयत्न करूनही महावितरणला योग्य ठिकाणी जमीन मिळण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे उपकेंद्राच्या उभारणीसाठी विलंब होत होता.
खिरविरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गणपत डगळे व ग्रामस्थांना महावितरणकडून जागेची अडचण सांगण्यात आली. त्यांनी याच परिसरातील जमीन मालक व कल्याण येथील व्यावसायिक मोहन राठोड यांच्याशी संपर्क साधून जमिनीची उपकेंद्रासाठी निकड असल्याचे सांगितले. त्यानंतर, राठोड यांनी या उपकेंद्रासाठी एक रुपयाच्या मोबदल्यात दीड एकर स्वमालकीची जमीन दिली. ही जमीन उपकेंद्रासाठी हस्तांतरणाची प्राथमिक प्रक्रिया नाशिक येथे नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे.
महावितरणचे नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी मोहन राठोड यांचा विद्युत भवन, नाशिक येथे नुकताच कृतज्ञतापूर्वक गौरव केला. स्थापत्य विभागाचे नाशिक विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश चालिकवार व अहमदनगर उपविभागाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता बबिता खोब्रागडे यांनी जमीन हस्तांतरणाच्या कामात सहकार्य केले.
................
फोटो १२ महावितरण
फोटो ओळ : महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांना जमिनीचे संमतीपत्र देताना मोहन राठोड व उपस्थित अधिकारी.