करंजी : पाथर्डी- नगर मार्गावरील करंजी घाटातील धोकादायक वळणावर गोडे तेलाचा टँकर उलटून सुमारे वीस हजार लीटर तेल वाहून गेले. त्यामुळे घाट अक्षरश: तेलमय झाला होता. या घटनेत टँकर चालक, क्लिनरसह दुचाकीवरील दोघे असे चौघेजण जखमी झाले. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. खोपोलीहून बीडकडे हा टँकर ( एम.एच.०४ ई.एल. ४१९३) गोडेतेल घेऊन जात होता. करंजी घाट उतरत असताना घाटातील माणिकबाबा देवस्थानानजीक चालकाचा ताबा गेल्याने टँकर धोकादायक वळणावर उलटला. टँकर उलटताच मोहटादेवीकडे जाणारे दोन भाविक व टँकर चालक, क्लिनर असे चौघेजण जखमी झाले. त्यांना तात्काळ नगरला हलविण्यात आले. जखमींमध्ये नितीन गायकवाड, हर्षल बेरड यांच्यासह चालक अमोल कोरडे, क्लिनर मदन देशमुख यांचा समावेश आहे. घटनेनंतर करंजी घाटात वाहतूक कोंडी झाली होती. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सहाय्यक फौजदार धनंजय फरतडे, त्यांचे सहकारी, करंजी पोलीस व ग्रामस्थांनी वाहतूक सुरळीतसाठी मोठी मदत केली. २० हजार लीटर गोडेतेल रस्त्यावरटँकर पलटी झाल्यानंतर वीस हजार लीटर गोडेतेल रस्त्यावर पुराप्रमाणे वाहत होते. तेलामुळे रस्ता निसरडा झाला होता. त्यामुळे रस्त्याने येणारे, जाणारे दुचाकीस्वार घसरुन पडत होते. निसरड्या रस्त्यामुळे दोन तासात सुमारे सत्तर मोटारसायकलस्वार घसरून पडले. तर अनेकांनी टँकरमधून खाद्यतेल नेण्यासाठी एकच गर्दी केली होती.बघ्यांची गर्दीकरंजी घाटात गोडेतेलाचा टँकर उलटल्याचे समजताच करंजी घाटाकडे अनेकांनी धाव घेतली. त्यामुळे घाटात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. बघ्यांची झालेली गर्दी व वाहनांच्या कोंडीमुळे वाहतूक सुरळीत करण्यास अडचण येत होती. टँकर उलटल्यानंतर जवळून जात असलेल्या दुचाकीला टँकरचा धक्का लागला. त्यामुळे दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. पोलिसांनी गर्दी हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. सतर्कतागोडेतेलाचा हा टँकर रस्त्यावर उलटल्यानंतर रस्ता निसरडा झाला. त्यामुळे दुचाकी वाहने उलटून अपघाताचे प्रमाण वाढू लागले. हा धोका लक्षात घेऊन पाथर्डी पालिकेचा अग्नीशामक बंब बोलावून रस्ता धुवून स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभाग व मैल कामगारांनी घटनास्थळापासून पाचशे मीटर अंतरावर माती टाकली. त्यामुळे सकाळी नऊ वाजता नगर-पाथर्डी मार्गावरील सकाळी नऊ पासून खंडित झालेली वाहतूक साडेदहाच्या सुमारास सुरळीत झाली. या घटनेमुळे सुमारे दीड तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. सध्या नवरात्रौत्सव सुरु असल्यामुळे मोहटा गडाकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. घटनेमुळे भाविकांचीही मोठी गैरसोय झाली. घटनेमुळे घाटात दोन्ही बाजुला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास विलंब झाला.
करंजी घाटात तेलाचा पूर
By admin | Updated: September 27, 2014 23:07 IST