मंगळवारी अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे व उमेश सूर्यवंशी यांनी सह आयुक्त सी. डी. साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. नेवासे रस्त्यावर अरिहंत इंडस्ट्रीज या फर्मचे गोदाम आहे. तेथे सोयाबीन तेलाचे हे डबे जप्त करण्यात आले. कमी दरामध्ये या तेलाची विक्री होत असल्याने आलेल्या संशयावरून तसेच ग्राहकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन ही कारवाई केल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी लोकमतला सांगितले.
केडगाव (नगर) येथील मनोज पोपटलाल ऑईल या कंपनीचे ओम ब्रँड नावाचे हे तेलाचे डबे आहेत. १५ किलोच्या या डब्यांवर तीन हजार रुपये किंमत आहे. मात्र बाजारामध्ये ते २२०० ते २५०० रुपयांना विकले जात होते, असे बडे यांचे म्हणणे आहे.
अन्न सुरक्षा आणि मानके या कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. प्रत्यक्षात डब्यांमधील तेलाच्या वजनाची पडताळणी केली जाणार आहे. त्यामध्ये दोष आढळून आल्यास संबंधित विभागाला कळविले जाणार आहे.
दरम्यान, केडगाव येथील मनोज पोपटलाल ऑईल इंडस्ट्रीजच्या तेथील फर्मवर कारवाई करून तेथेही दहा लाख रुपये किमतीचा माल ताब्यात घेण्यात आला आहे. तेथे दोनशेहून अधिक डबे ताब्यात घेण्यात आले आहेत, अशी माहिती राजेश बडे यांनी दिली. तेल डब्यांच्या किमती कमी ठेवणे कसे शक्य झाले तसेच या मागे काय गौडबंगाल आहे, याचा शोध घेतला जाईल, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.
----------
यापूर्वीही कारवाई
फेब्रुवारी महिन्यामध्ये श्रीरामपुरातून जे. जे. आईल इंडस्ट्रीज या सोयाबीन तेलाच्या फर्मवर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. त्यात १४ लाख ९३ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता. यानंतर मंगळवारी झालेली ही जिल्ह्यातील दुसरी मोठी कारवाई मानली जात आहे.
----------
तेलाच्या किमती आभाळाला भिडल्याने ग्राहकांच्या सुरक्षेखातर अन्न सुरक्षा विभागाकडून धडक कारवायांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तेलातील फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी सतर्क राहून पुढे येत प्रशासनाला अनुचित प्रकाराची माहिती द्यावी.
-राजेश बडे, अन्न सुरक्षा अधिकारी
------------