अहमदनगर : नायलाॅन मांजामुळे अनेकजण गंभीर जखमी झाल्याच्या घटना समोर आल्याने पोलिसांनी नायलाॅन मांजा विकणाऱ्यांवरच फास आवळला असून नगर शहरातील प्रोफेसर काॅलनीत गुरूवारी एका दुकानदारास ताब्यात घेऊन त्याच्याकडील सुमारे ५० हजारांचा मांजा व रोख रक्कम जप्त केली आहे. याशिवाय पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसारही चार गुन्हे दाखल झाले आहेत.
मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात व जिल्ह्यात पतंगोत्सव रंगतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून पतंग उडवण्यासाठी नायलाॅन मांजा वापरला जातो. नगर शहरात बुधवारी नायलाॅन मांजाने एकाचा गळा कापला. नायलाॅन मांजा विक्री व वापरास शासनाने प्रतिबंध केला असल्याने ही विक्री रोखण्यासाठी नगर शहरात उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तैनात करण्यात आली होती. दरम्यान, गुरूवारी तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमदान हडको येथे एका पतंग सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी त्याच्याकडून १५ हजार रूपये किमतीच्या नायलाॅन मांज्याच्या ५० चकऱ्या, ९ हजार रूपये किमतीच्या मांजा गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या मोटारसह लाकडी मशीन, तसेच मांजा विक्रीतून आलेली २६ हजार ५८० रूपयांची रक्कम असा ऐवज जप्त करून पोलिसांनी विक्रेता अजय बाबासाहेब राऊत (वय ३२, रा. प्रेमदान हडको) यास ताब्यात घेतले आहे.
------
फोटो - १४मांजा कारवाई
तोफखाना पोलिसांनी नायलाॅन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई मांजासह एकास ताब्यात घेतले.