अहमदनगर : कोरोनाच्या रुग्णांची नगर शहरात वाढ झाली आहे. दुसरी लाट ओसरल्यानंतर नगर शहरातील एका दिवसात बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या प्रथमच ५० च्या वर गेली आहे. शनिवारी जिल्ह्यात ७२९ रुग्ण आढळून आले असून संगमनेर, श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक तर नेवासा तालुक्यात सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात शनिवारी जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमध्ये १८४, खासगी रुग्णालयात २३९ आणि रॉपिड ॲंटिजन चाचणीत ३०६ रुग्ण बाधित झाले आहेत. त्यामध्ये संगमनेर (१०३),श्रीगोंदा (९६), पाथर्डी (७९), पारनेर (६१), कर्जत (५५), अकोले (५३), नगर शहर (५३), नगर ग्रामीण (४३), शेवगाव (४१), राहुरी (३८), राहाता (३०), कोपरगाव (२४),जामखेड (१९), श्रीरामपूर (१४), नेवासा (१०), इतर जिल्हा (९), भिंगार (१) येथील रुग्णांचा समावेश आहे.
-------------
नगरमधील कोविड सेंटर पुन्हा सुरू
रुग्ण वाढत असल्याने नगर शहरातील महापालिकेचे दोन्ही कोविड सेंटर पुन्हा सुरू झाले आहेत. दुसरी लाट ओसरल्यानंतर कोविड सेंटर जवळपास बंदच झाले होते. महापालिकेच्या दोन कोविड सेंटर मिळून पाच ते दहा रुग्ण उपचारासाठी यायचे. मात्र आता नटराज कोविड सेंटरमध्ये १३ आणि जैन पितळे कोविड सेंटरमध्ये ३ रुग्ण दाखल झाले आहेत. दाखल झालेले रुग्ण बोल्हेगाव परिसरातील कामगार असल्याची माहिती आहे. त्यामुळे इंडस्ट्रियल एरियात पुन्हा एकदा सर्व नियमांचे पालन होते की नाही, हे पाहण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. दरम्यान नगर शहरातील गर्दी, वर्दळ ही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
----------------