शिर्डी : शिर्डी संस्थानने ड्रेसकोडबाबत भाविकांना केलेल्या आवाहनाचे ग्रामविकासमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी समर्थन केले. संस्थानने भाविकांना सक्ती केलेली नसून, केवळ आवाहन केले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये, मंदिरात येताना पावित्र्य राखावे, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.
मुश्रीफ यांनी गुरुवारी (दि.३) साईदरबारी हजेरी लावली. त्यावेळी ते म्हणाले की, साई संस्थानचे विश्वस्त मंडळ नियुक्त करण्यास कोरोनामुळे विलंब झाला. मात्र, मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करून नेमणूक करू. साई संस्थानचे सीईओ सातत्याने बदलत आहेत. अधिकारी चांगले काम करीत असतील, तर त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत बदली करू नये यासाठीही मुख्यमंत्र्यांकडे आग्रह करणार आहे.
-----------
धुळे-नंदुरबारमधील पराभावाबाबत मौन
धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे अमरीश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सावध भूमिका घेतली. राष्ट्रवादीचे मते फुटली. त्यामुळे अमरीश पटेल निवडून आले का? असे मुश्रीफ यांना विचारले असता, ‘मला माहिती नाही,’ असे ते म्हणाले. अमरीश पटेल हे काँग्रेसमधूनच भाजपत गेले आहेत. त्यांनी पक्ष बदलला आहे. आता तेथे कोणाचे किती मतदार आहेत, याची मी काही माहिती घेतली नाही. एकनाथ खडसे यांना पक्षात घेतल्याचा राष्ट्रवादीला या निवडणुकीत फायदा झाला नाही का? असे विचारले असता मंत्री मुश्रिफ म्हणाले, एकनाथ खडसे यांचा येथे काही संबंध येत नाही, असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.