शेवगाव : प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजे. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात मोठी स्पर्धा आहे. यासाठी सर्व सुविधा, ज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम शिक्षकांचे आहे. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले यांनी केले.
संगमनेर येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने नुकतेच शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित शिक्षकांसोबत संवाद साधताना घुले बोलत होते. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या परिषदेस गटशिक्षण अधिकारी तृप्ती कोलते, शिक्षण विस्तार अधिकारी शैलेजा राऊळ, रामनाथ कराड, शंकर गाडेकर आदी उपस्थित होते.
घुले म्हणाले, मागील दीड वर्षे असाधारण आणि वेगळे होते. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नव्हते. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात केली. यू-ट्यूब चॅनेल, गुगलच्या माध्यमातून आपण ऑनलाइन शिक्षण सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे काम केले आहे.
कोरोना काळात केलेली बहुमूल्य मदत, लसीकरण, कोरोना चाचणी, चेक पोस्ट आदी बाबतीत संबंधित प्रशासनाच्या सोबतीला शिक्षकांनी केलेल्या कामाचे कौतुक करताना वर्षभर राबविण्यात येत असलेले उपक्रम अभिनंदनीय असून असे उपक्रम यापुढेही घेण्यात यावेत, असे आवाहन केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले व पंचायत समितीच्या माध्यमातून सर्व सुविधा पुरवल्या जातील, असे आश्वासन घुले यांनी दिले.