निघोज : निघोज (ता.पारनेर) येथील व्यापारी असोसिएशनने लॉकडाऊनला विरोध दर्शविला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी महसूल, पोलीस प्रशासनाला दिले आहे.गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने लॉकडाऊन असल्याने व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रित असली तरी महसूल प्रशासनाने मात्र निघोज व परिसरातील गावे लॉकडाऊन केली आहेत. अनेक व्यावसायिक फक्त व्यवसायावर अवलंबून आहेत. इतर उत्पन्नाचा कोणताही मार्ग त्यांच्याकडे नाही. शिवाय दुकानदारी सुरू असल्यानंतर कोरोनाचे सर्व नियम व्यावसायिक पाळत आहेत. कोरोनावर लोकप्रबोधन करून जनतेला शासकीय नियम पाळण्यासाठी प्रवृत्त करीत असतात. यासाठी निघोज व परिसरातील सर्व व्यावसायिकांना लॉकडाऊन नियम शिथिल करण्यासाठी महसूल, पोलीस, आरोग्य विभागाने सहकार्य करावे, असे आवाहन निवेदनात केले आहे.
निवेदनाची प्रत मंडलाधिकारी दत्तात्रय शेकटकर यांना देण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.
यावेळी व्यापारी मोहन खराडे, सुनील खराडे, बाळासाहेब खोसे, नवनाथ ढवण, मोहन श्रीमंदिलकर, संकेत लाळगे, विजय गांधी, महेंद्र शेटे, सत्यवान भुकन, अतुल वरखडे, मंगेश वराळ, मोहन कवाद, ललित गांधी, संजय भंडारी आदींसह व्यापारी असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.
----
२४ निघोज
निघोज व्यापारी असोसिएशनचे निवेदन स्वीकारताना मंडलाधिकारी दत्तात्रय शेकटकर.