कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार लघुदाब वीजवाहिनीच्या खांबापासून ३० मीटरच्या आत असलेल्या कृषिपंपांना परिसरातील नजीकच्या रोहित्राची क्षमता पर्याप्त असल्यास नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहेत. यासोबतच ज्या कृषिपंपांद्वारे अनधिकृत वीजवापर सुरू आहे त्यांनाही नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी रोहित्रांची क्षमता पर्याप्त नाही, त्या रोहित्रांची क्षमतावाढ करण्यात येणार आहे. लघुदाब वीजवाहिनीच्या खांबापासून ३० मीटरच्या आत अंतर असलेल्या अहमदनगर मंडळामध्ये १७७४ वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत, तर इतर योजनेतून सुद्धा जिल्ह्यात कृषिपंपांच्या ९५० जोडण्या या कालावधीत देण्यात आल्या आहेत.
नवीन कृषीपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये जाहीर झालेल्या या योजनेत थकबाकी भरण्यासाठी विविध सवलती जाहीर झाल्यापासून अहमदनगर मंडलात १ लाख १० हजार ९३० शेतकऱ्यांनी थकबाकीपोटी ७० कोटी ७ लाख रुपयांचा याप्रमाणे भरणा करून या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेचा लाभ मंडळातील सर्वच शेतकरी बंधूंनी घेण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी केले आहे.