अहमदनगर : सध्या देशात रोजगार मागणाऱ्यांची संख्या जास्त असून, त्या तुलनेत देणारे कमी असल्याने बेरोजगारीची मोठी समस्या आहे. त्यामुळे रोजगार देणाऱ्यांची संख्या वाढणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन येथील आयएमएस (इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज) संस्थेत उद्योजक निर्मितीसाठी नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.भारतीय उद्योजकता विकास केंद्र (अहमदाबाद) यांनी दूरशिक्षणाचा एक वर्ष कालावधीचा ‘डिप्लोमा इन इन्टरप्रिनरशीप अॅण्ड बिझनेस मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम सुरू करण्यास आयएमएसला मान्यता दिली आहे. राज्यात नगरलाच तो प्रथम सुरू होत आहे. नवीन उद्योगांची निर्मिती आणि त्यांचे व्यवस्थापन हा या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश आहे. उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक बाबींपासून प्रकल्प अहवाल तयार करणे, बँकांचे अर्थसहाय्य, यंत्रसामुग्री व व्यवस्थापन याबाबत विद्यार्थ्यांना इडीआयचे विशेष तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. कुठल्याही शाखेचा पदवीधर, पदविकाधारकास एका शैक्षणिक वर्षात चार वेळा प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे़ पदविका पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय उभारणीच्या दृष्टीने तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध असेल, अशी माहिती आयएमएसचे सरसंचालक डॉ. शरद कोलते यांनी दिली. यावेळी संचालक डॉ. एम. बी. मेहता, प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, डॉ. मीरा कुलकर्णी, प्रा. ऋचा तांदूळवाडकर, प्रा. विजय शिंदे, राधिका मुळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)निवृत्तीनंतरचे नियोजन विषयावर कार्यशाळानोकरीतून निवृत्त झाल्यानंतर आपल्या हातात तुटपुंज्या पैशाशिवाय काहीच उरत नाही. त्यामुळे नोकरीत असतानाच भविष्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असते. याबाबतच आयएमएसमध्ये २ आॅगस्ट रोजी कार्यशाळा आयोजित केली आहे. इच्छुकांनी संस्थेत डॉ. मीरा कुलकर्णी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उद्योगनिर्मितीचा नवा अभ्यासक्रम
By admin | Updated: July 17, 2014 00:29 IST