नेवासा: ‘ज्ञानोबा माउली तुकाराम, माउली-माउली’ चा गजर करीत राज्यात शिस्तप्रिय असलेल्या नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या पायी दिंडी पालखीचे बुधवारी संत ज्ञानेश्वरांची पुण्यभूमी असलेल्या नेवासेनगरीत दुपारी टाळ- मृदुंगाच्या गजरात आगमन झाले. यावेळी दिंडीचे राज्यातील पहिले रिंगण पार पडले. रिंगण सोहळा पाहण्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शिवकलेची प्रात्यक्षिके, बदामबाई विद्यालयातील विद्यार्थ्यांची दिंडी, अश्व नृत्य उपस्थितांचे आकर्षण ठरले. गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बसस्थानकात आगाराच्यावतीने एस. टी. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तोफांची सलामी देत दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी राज्यातील पहिला रिंगण सोहळा ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’ च्या गजरात सादर करण्यात आला. वारकरी रिंगणासह झेंडेकऱ्यांचे रिंगण, टाळकऱ्यांचे रिंगण, अश्वांचे रिंगण सादर करण्यात आले. यावेळी अश्वाचे रिंगण व नृत्य, सेव्हन ईगल मार्शल आर्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिवकलेची प्रात्यक्षिके उपस्थितांचे आकर्षण ठरले. छत्रपती शिवरायाच्या वेशभूषेत गंगापूर तालुक्यातील आंबेवाडी येथील शिवभक्त सारंगधर पानकडे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. बदामबाई गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वारकरी दिंडीत निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई अशी वेशभूषा करुन वारकरी संप्रदायाच्या संस्कृतीचे दर्शन घडविले. आगाराच्यावतीने भास्करगिरी महाराजांचा सत्कार करण्यात आला. आमदार बाळासाहेब मुरकुटे, आगारप्रमुख सुरेश देवकर यांच्या हस्ते पालखीतील श्रींची महाआरती करण्यात आली. खोलेश्वर मंदिर देवस्थानच्यावतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत चौकात माजी सरपंच नंदकुमार पाटील, सतीश गायके, गोरख घुले, योगेश रासने, मुख्य पेठेत व्यापाऱ्यांच्यावतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले. संभाजी चौकात मुथ्था परिवाराच्यावतीने अल्पोपहार दिला. (तालुका प्रतिनिधी)
नेवाशात पहिले रिंगण
By admin | Updated: June 30, 2016 01:22 IST