अहमदनगर : केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेल्या शेतकरीविरोधी कायद्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर निदर्शने करण्यात आली. यात दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देऊन शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, जिल्हा युवक कार्याध्यक्ष संजय कोळगे, शारदा लगड, प्रदेश सरचिटणीस अंबादास गारुडकर, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, अशोक बाबर, सबाजीराव गायकवाड, किसनराव लोटके, उद्धव दुसुंगे, सुहास कासार, केशव बेरड, रत्नाकर ठाणगे, सीताराम काकडे, आबासाहेब सोनवणे, मनोज कोकाटे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मार्केट यार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी भाषणात भाजप सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, भाजप सरकार आडमुठी भूमिका घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्यास तयार नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याची तयारी भाजप सरकारने चालवली आहे. हजारो शेतकरी रस्त्यावर उतरलेले असतानादेखील केंद्र सरकार डोळेझाक करीत आहे. भर थंडीत आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर थंड पाण्याचा मारा केला जातोय. शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवता, मुठभर भांडवलदारांच्या फायद्यासाठी शेतकरीविरोधी धोरण राबविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शेलार यांनी शेतकरी विरोधी असलेल्या कृषी विधेयकाचा निषेध करून, शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिला. तर भाजप सरकार भांडवलदारांच्या दावणीला बांधले गेले असून, त्यांचे हित जपण्यासाठी अशा पद्धतीने निर्णय घेत असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला तातडीने हमीभाव देण्यात यावा, तसेच कृषीविषयक विधेयक तातडीने मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली.
----------------
फोटो - ०३ राष्ट्रवादी आंदोलन
केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेल्या शेतकरीविरोधी कायद्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर निदर्शने करून दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यात आला.