अहमदनगर : राज्यातील नगरपालिकांच्या डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढविण्याची तयारी सुरू केली असल्याचे संकेत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे यांनी मंगळवारी नगरमध्ये पत्रकार परिषदेत दिले़स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीस वळसे उपस्थित होते़ बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ ते म्हणाले, पक्षाच्या अधिकाधिक कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, यासाठी नगरपालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली असून, तालुकानिहाय बैठका घेवून आढावा घेण्यात येणार आहे़ बैठका घेऊन निवडणुकीची रणनिती आखली जाणार आहे़ तयारी स्वबळाचीच आहे़ पण अंतिम निर्णय वरिष्ठांकडून जाहीर केला जाणार असल्याचे वळसे म्हणाले़ पक्ष बांधणीविषयी पत्रकारांनी छेडले असता विधानसभा निवडणुकीच्यावेळी फाटाफूट झाली आहे़ पक्षाकडून पॅचअप करण्याचे काम सुरू आहे़ सरकारावर सामान्य जनता नाराज आहे़ सध्याच्या भाजपा सरकारमध्ये गंमत सुरू असल्याचे सांगून वळसे यांनी भ्रष्ट नेत्यांवर टीका केली़ विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच राज्यातील बहुतांश नगरपालिकांच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होत आहेत़ या निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी सर्वच राजकीय पक्ष झाडून कामाला लागले आहेत़ नगर जिल्ह्यातील आठ महत्वाच्या नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत़ या निवडणुकाही राष्ट्रवादी स्वबळावर लढविणारच आहे, त्याचबरोबर राज्यातील निवडणुकाही स्वबळावरच होण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)
नगरपालिका स्वबळावर लढविण्याची राष्ट्रवादीची तयारी
By admin | Updated: July 13, 2016 00:32 IST