अहमदनगर: नगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी कॉँग्रेसला मिळावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी व अपक्ष नगरसेवकांनी केली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी व अपक्ष सर्व नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला जाणार आहेत. तसा निर्णय नगरसेवकांनी राष्ट्रवादी भवनात झालेल्या बैठकीत घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. बाळासाहेब बोराटे, नज्जू पहिलवान, अरिफ शेख, संपत बारस्कर, अभिषेक कळमकर, अविनाश घुले, विपुल शेटिया, शरद ठाणगे, कुमार वाकळे, नसीम शेख, अरविंद शिंदे या राष्ट्रवादी नगरसेवकांची बैठक राष्ट्रवादी भवन येथे मंगळवारी सकाळी झाली. नगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा कॉँग्रेसच्या ताब्यात आहे. कॉँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीकडे प्रबळ उमेदवार आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला मिळावी अशी या नगरसेवकांची मागणी आहे. उमेदवार कोण हे पक्षाने ठरवावे मात्र शहरात कॉँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे असे मत ज्येष्ठ नगरसेवक अरिफ शेख यांनी मांडले. राष्ट्रवादी व अपक्ष नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला बारामती येथे जाणार असून तेथे नगर शहरातील स्थिती मांडली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रवादीला ही जागा मिळाली तर निवडणुकीला सामोरे कसे जायचे, कोणते मुद्दे मांडून प्रचाराच्या रणांगणात उतरायचे, विरोधकांची कमकुवत बाजू कोणती, ती लोकांसमोर कशी मांडायची? यावरही बैठकीत चर्चा झाली. (प्रतिनिधी)नगरसेवक जाणार दादांच्या भेटीला या बैठकीच्या सुरुवातीला महापौर संग्राम जगताप हे उपस्थित नव्हते. बैठक सुरू झाल्यानंतर काही नगरसेवकांनी जगताप यांना बैठकीसाठी बोलावून घेतले. जगताप आल्यानंतर नगरसेवकांनी त्यांच्यासमोरही आपल्या भावना व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री पवार यांच्या भेटीसाठी नगरसेवक जाणार असून राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष या नात्याने जगताप यांनी ही भेट घडवून आणण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केली. राष्ट्रवादीच्या नगर शहरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पुढील आठवड्यात होणार असून त्यानंतर बारामतीला जाण्याचा निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते अरविंद शिंदे यांनी दिली.
नगरच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा
By admin | Updated: July 23, 2014 00:18 IST