राजूर/अकोले : भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच असून, भंडारदरा धरणातील पाणीसाठा साठ टक्क्याहून अधिक झाला. मुळा खोऱ्यातील घोटी शिळवंडी येथील १४६ दलघफू क्षमतेचा लघुपाटबंधारे तलाव गुरूवारी ओसंडून वाहू लागला. भंडारदरा पाणलोटातील रतनवाडी येथे गुरूवारी सकाळपर्यंत आठ इंच, तर घाटघरला पाच इंचाहून अधिक पावसाची नोंद झाली.सोमवारपासून या दोन्ही धरणांच्या पाणलोटात मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या त्यामुळे मुळा खोऱ्यातील आंबित, कोथळे, बलठण, शिरपुंजे आणि घोटी शिळवंडी येथील पाचही लघुपाटबंधारे तलाव ओसंडून वाहू लागले, तर प्रवरा पट्ट्यातील वाकी आणि टिटवी हे दोन लघुपाटबंधारे तलाव भरून वाहू लागले. दोन दिवसांपासून आढळा खोऱ्यातील पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे या खोऱ्यातीलही सांगवी आणि पाडोशी ही दोन्ही छोटी धरणे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्यामुळे आढळातील पाणीसाठ्यातही नवीन पाण्याची आवक सुरू झाली. तालुक्यातील दक्षिण, उत्तर अािण पश्चिम पट्ट्यातील सर्व लघूपाटबंधारे तलाव पूर्ण भरले तर पूर्व भागातील बोरी आणि बेलापूर या छोट्या धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झाली.भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचे प्रमाण काहीशे कमी झाले असले तरी सकाळी संपलेल्या चोवीस तासात या ७५४ दलघफू नवीन पाणी येत धरणातील साठा ६० टक्क्यांपर्यंत पोहचला. तर निळवंडे धरणातील पाणीसाठा दोन टीएमसीहून अधिक झाला. मुळा भंडारदरा खोऱ्यातील डोंगररांगा ओल्याचिंब झाल्या असून, कड्या कपराहून धबधबे फेसाळत वाहू लागले. त्यामुळे येथील निसर्गानेही कात टाकली.राजूर परिसरात व तालुक्याच्या पूर्व भागात सकाळी साडेसातपासून बारापर्यंत जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. (वार्ताहर)नवी आवकभंडारदरा धरणातून वीज निर्मितीसाठी ८४९ क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. भंडारदरा धरणात आज दिवसभरातील १२ तासात २५० दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक होत यातील पाणीसाठा ६७८४ दलघफू झाला. तर निळवंडे धरणातील पाणीसाठा २१७६ दलघफूटापर्यंत पोहचला. आढळा धरणाचा पाणी साठा सकाळी सहा वाजता १८७ दलघफू होता. मुळा आज १२ टीएमसीमुळा धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत असून, शुक्रवारी सकाळी ६ वाजता पाणीसाठा १२००० दशलक्ष घनफूटांचा टप्पा ओलांडणार आहे़ २६००० दलघफू पाणी साठवण असलेल्या मुळा धरणात गुरूवारी दुपारी ३ वाजता ११५०५ दलघफू पाणी होते. मुळा नदीत २३७६५ क्युसेकने आवक सुरू होती़ सायंकाळी ६ वाजता धरणात ११५३९ दलघफू पाणीसाठ्याची नोंद झाली़ हरिश्चंद्र गड परिसरात दिवसभर रिमझिम पावसाची आवक सुरू होती़ गेल्या वर्षी याच कालावधीत मुळा धरणात १७२०८ दलघफू पाणी साठा होता, अशी माहिती आऱ के. पवार यांनी दिली़ यावर्षी धरण भरणार का याबाबत शेतक-यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे़
भंडारदऱ्याचा निसर्ग फुलला
By admin | Updated: August 1, 2014 00:22 IST