कर्जत : तालुक्यातील थेरवडी येथील सुनीता दादा गिते (वय ४०) आणि त्यांचा मुलगा शुभम दादा गिते (वय १२) हे दोघे झोपेत असताना त्यांच्या डोक्यात टणक वस्तुचे घाव घालून त्यांचा खून करण्यात आला. या प्रकरणी मयत महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून महिलेच्या पतीसह सासरकडील सहा जणांविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात रविवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी मयत महिलेचा भाऊ परशुराम ज्ञानोबा लटपटे (वय ३९, रा. भानगाव, ता. श्रीगोंदा) यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयत सुनीताचा नवरा दादा मारुती गिते, सासरे मारुती योगिराज गिते, सासू गिरजाबाई मारुती गिते, नणंद नंदा विजय हंगे (रा. थेरवडी), नणंद सिंधू बाबासाहेब हंगे, नंदेचा मुलगा संतोष बाबासाहेब हंगे (रा. कवडगाव, जामखेड) यांनी वेळोवेळी सुनीताचा शारीरिक व मानसिक छळ केला. शनिवारी (दि. ९) च्या रात्री ते घराबाहेर पडवीत झोपलेले असताना त्यांच्या डोक्यात टणक वस्तुने वार करून दोघांचा खून केला. ही घटना रविवारी (दि.१०) सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध खून आणि हुंड्यासाठी छळ केल्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपअधीक्षक विजय लगारे, पोलीस निरीक्षक पी. व्ही. इंगळे यांनी भेट देवून पाहणी केली. या गुन्ह्यातील आरोपी मारुती योगिराज गिते, विजय हंगे, सिंधू बाबासाहेब हंगे, संतोष बाबासाहेब हंगे अशा चार जणांना अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक ए. टी. चिंतले करीत आहेत. \मालमत्तेचा वादसुनीता दादा गिते ही बारा वर्षांपासून थेरवडी (ता. कर्जत) येथील सासरच्या घरी राहत होती. वडिलोपार्जित जमीन सासरच्या लोकांनी विकू नये, म्हणून सुनीताने न्यायालयात दावा दाखल केला होता. वडिलोपार्जित जमीन विकू नये, या अटीवर तिने आपसात तडजोड केली होती. ही तडजोड अमान्य होती.
कर्जत तालुक्यात मायलेकराचा खून
By admin | Updated: April 11, 2016 00:43 IST