अहमदनगर : राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर खून प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे जिल्हा रुग्णालयातून पसार झाला. शनिवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तत्काळ आरोपीचा शोध सुरू केला आहे.
दातीर खून प्रकरणात राहुरी पोलिसांनी मोरे याला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती; मात्र त्याला कोरोनाची लागण झाल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. रुग्णालयातील कोरोना कक्षात मोरे याच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास मोरे ड्युटीला असलेल्या पोलिसांची नजर चुकवून तो पसार झाला. पळून जाताना आरोपीने एक स्कूटर नेल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर राहुरी पोलिसांनी जिल्हाभरातील पोलिसांना आरोपीबाबत माहिती दिली असून, त्याच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत.