अहमदनगर: शहरात साथ रोगाने थैमान घातले असून त्याला आळा घालण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका नगरसेवकांनी महासभेत ठेवला. त्याची दखल घेत महापौर संग्राम जगताप व आयुक्त विजय कुलकर्णी यांनी विभागप्रमुखांना लेखी आदेश दिले आहेत. शहरातील पहाणीचा अहवाल विभागप्रमुखांनी रोजच्या रोज आयुक्त व महापौरांना सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. महासभेत नगरसेवकांनी साथ रोगासंदर्भात काही उपाययोजना सुचविल्या होत्या, त्याची अंमलबजावणी आयुक्तांनी आदेशात केली आहे. आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, उपआरोग्य अधिकारी डॉ. एन.एस.पैठणकर, शहर अभियंता नंदकुमार मगर, यंत्र अभियंता परिमल निकम या विभागप्रमुखांना लेखी आदेश काढण्यात आले. साथ रोग पसरलेल्या भागाची स्वत: पहाणी करावी. गटारी स्वच्छता करून कचरा उचलण्यात यावा. खासगी डॉक्टरांशी संपर्क करून रुग्णांची माहिती घ्या. हॉटेल्स, वसतीगृह, खानावळी येथील पाण्याची तपासणी करावी, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता नियमित करावी. पाईपलाईन लिकेज काढण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. पाणी साठवणूक टाक्यांची स्वच्छता केल्यानंतर त्याचा फलक दर्शनी भागात लावावा अशा सूचना आयुक्त, महापौरांनी विभागप्रमुखांना केल्या आहेत. पालिकेच्या विभागप्रमुख शहराच्या कोणत्या भागात फिरले. काय कार्यवाही केली. उपाययोजना काय, कोणत्या आजारी रुग्णांना भेटले. त्याचे नाव पत्ता या संपूर्ण माहितीसह अहवाल दररोज सायंकाळी पाच वाजता आयुक्त व महापौर कार्यालयास सादर करण्याचे आदेशात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
मनपा आयुक्तांचे आदेश
By admin | Updated: June 6, 2023 11:59 IST