पाथर्डी : भारतीय जनता पक्षाचा चेहरा बदलण्याचे काम स्व.मुंडेंनी केले. ते ओबीसी समाजाचे नेते होते़ त्यामुळे बहुजन समाजाने त्यांच्या मृत्युची सीबीआय चौकशीची मागणी केली़ परंतु केंद्र सरकार मुंडेंच्या मृत्युची चौकशी का करीत नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली़भुजबळ म्हणाले, मुंडे गेल्यानंतर पांडुरंग फुंडकर ढसढसा रडले़ भारतीय जनता पक्षाला चेहरा देण्यासाठी मुंडेंनी कष्ट केले. माळी, वंजारी,धनगर,दलित यांना एकत्र केले़ परंतु मुंडे गेले आणि प्रकाश शेंडगे यांना भाजपाने दूर करीत आपला मूळ चेहरा दाखवला़ मुंडेंच्या निधनाच्या चौकशीची मागणी बहुजन समाजाने केली़ परंतु केंद्र सरकार का चौकशी करीत नाही. मुंडेंच्या अंत्यविधीला यायला मोदींना वेळ नव्हता़ आता मात्र २५ सभा घ्यायला वेळ आहे. प्रत्येक गोष्टीची प्रसिद्धी करण्याची त्यांना सवय आहे़ आईचे दर्शन घेतानासुद्धा प्रसिद्धी करावी लागते़ महाराष्ट्राला नंबर एक करायची भाषा ते वापरतात़ परंतु महाराष्ट्र नंबर एक आहेच, तुम्ही काय पुढे नेणार? केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर संक्रांत आणण्याचे काम चालविले आहे़ केंद्रात एक शिवसेनेचा एक मंत्री घेऊन बोळवण केली़ बाळासाहेब ठाकरे असते तर त्याच वेळी युती तोडली असती, अशी टीका भुजबळ यांनी केली़ यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग, नरेंद्र घुले, केदारेश्वरचे अध्यक्ष प्रताप ढाकणे, चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा मेधा कांबळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सीताराम बोरुडे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
मुंडें यांच्या मृत्युची सीबीआय चौकशी केंद्राने गुंडाळली
By admin | Updated: October 7, 2014 23:42 IST