शहरी भागातील वाढती ग्राहक संख्या व आधुनिक जीवनशैलीमुळे विजेचा वाढता वापर लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत महावितरणने ४४ मंडल अंतर्गत २५४ शहरांमध्ये वीज वितरण यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी विविध कामे सुरू केली. यामध्ये २०११ च्या जनगणनेनुसार १५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांची निवड करण्यात आली. या शहरांमध्ये घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीजग्राहकांना अखंडित व योग्य दाबाचा वीजपुरवठा करणे, नवीन वीजजोडण्या देण्यासाठी वीजयंत्रणेचे विस्तारीकरण, सक्षमीकरण व आधुनिकीकरण करणे तसेच वीजहानी कमी करणे व त्याच्या योग्य मोजमापासाठी म्हणजे ऊर्जा अंकेक्षणासाठी ग्राहक व फीडरला योग्य क्षमतेचे मीटर लावणे आदी कामे करण्यात आली आहे.
गेल्या सव्वा वर्षातील कोरोना काळातील खडतर आव्हानाला सामोरे जात महावितरणने एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतील २३०० कोटी रुपये खर्चाची कामे पूर्णत्वास आणली आहेत. यामध्ये प्रस्तावित १२० नवीन उपकेंद्रांपैकी ११९ उपकेंद्र कार्यान्वित झाले आहेत तर १०० पैकी १०० उपकेंद्रांची क्षमतावाढ करण्यात आली आहे. नवीन वितरण रोहित्रांचे ४ हजार ९८७ पैकी ४ हजार ९७० कामे पूर्ण झाली असून प्रस्तावित सर्वच ४ हजार २०७ रोहित्रांची क्षमतावाढ करण्यात आली आहे. उच्च व लघुदाबाच्या ३ हजार ३४७ पैकी ३ हजार ४२ किलोमीटर वीजवाहिन्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे तर तब्बल ६ हजार ६९४ किलोमीटरच्या भूमिगत वीजवाहिन्या व एरियल बंचची कामे पूर्ण झाली आहे. सोबतच शहरी भागामध्ये ५ लाख ३० हजार ३४० मीटर बदलण्यात आले आहे.
----------------
देशात सर्वाधिक भूमिगत वीजवाहिन्या महाराष्ट्रात
एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतून महावितरणने देशात सर्वाधिक ४ हजार ३६४ किलोमीटर लांबीच्या वीजवाहिन्या प्रस्तावित केल्या आणि त्याची कामे पूर्ण केली आहे. शहरी भागातील उपरी वाहिन्यांचे जाळे कमी करणे, यंत्रणेतील बिघाडांचे प्रमाण कमी व्हावे तसेच शहराच्या सौंदर्यीकरणाला चालना देण्यासाठी योजनेत भूमिगत वाहिन्यांना प्राधान्य देण्यात आले. त्याप्रमाणे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक भूमिगत वीजवाहिन्यांचे काम पूर्ण झाले, हे या योजनेचे वैशिष्ट्य ठरले आहे.