संगमनेर : कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून शिक्षण संस्था, शाळा, कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालये बंद असून, विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. जिल्ह्यात काही ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या कमी तर काही ठिकाणी ती वाढत असताना शाळा सुरू झाल्या आहेत; मात्र आपल्या मुलाला शाळेत पाठविताना प्रत्येक आईला काळजी वाटते आहे. मुलांच्या आरोग्याबरोबर त्यांचे शिक्षणही महत्त्वाचे असून, काळजावर दगड ठेवून पालक मुलांना शाळेत पाठवत आहेत.
जिल्ह्यात माध्यमिक शाळांची घंटा वाजल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आठवी ते बारावीच्या दीडशे शाळा सुरू झाल्या. त्यात १४ हजार ७७८ विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविली गेली. काही गावात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. रुग्ण नसलेल्या गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी शासन निर्णय काढून सूचना दिल्या. त्यानुसार, शाळा सुरू करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या ठरावावर, तसेच पालकांच्या संमतीवर सोपविण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यात एकूण १ हजार ५९६ गावे असून, ८४९ गावांमध्ये कोरोना रुग्ण नाहीत. जिल्ह्यात आठवीपासून बारावीपर्यंत सुमारे तेराशे शाळा आहेत. त्यापैकी १५ जुलैला १३३ तर १६ जुलैला १५१ शाळा जिल्ह्यात सुरू झाल्या असून, त्यात १४ हजार ७७८ विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविली गेली आहे.
------------------
अशी घ्यावी काळजी
शाळेत मास्क काढू नये. शाळेतून घरी आल्यानंतर शाळेतील कपडे धुण्यासाठी टाकावेत, अंघोळ करावी. शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करावे. जेवण करण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत. थंडी, ताप जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
------------
शासनाने अवलंबिलेल्या धोरणानुसार, शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येते आहे. पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यासाठी आवश्यक निकष पूर्ण करत सामाजिक अंतराचे नियम पाळत शाळा सुरू केल्या आहेत.
- साईलता सामलेटी, गटशिक्षण अधिकारी, संगमनेर पंचायत समिती
------------
ऑनलाइन शिक्षण; समस्यांचा सामना
कोरोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येते आहे; मात्र ऑनलाइन शिक्षणासाठी अनेक अडचणी आहेत. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडे ॲण्डॉइड मोबाइल, इंटरनेट, संगणक, लॅपटाॅप या गोष्टी असणे आवश्यक आहेत; मात्र ग्रामीण भागात आजही सर्वसामान्य पालकांकडे ॲण्डॉइड मोबाइल नसतो, मोबाइल असला तर रेंज नसते. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
--------------
तालुकानिहाय सुरू झालेल्या शाळा
अकोले ४६, संगमनेर २२, कोपरगाव ४, राहाता २४, राहुरी ५, श्रीरामपूर ३, नेवासा १४, शेवगाव ४, पाथर्डी ११, जामखेड २, कर्जत १, श्रीगोंदा ४, पारनेर २, नगर ७
-------------
मुलगा विज्ञान शाखेत बारावीत शिक्षण घेतो. सध्या ऑनलाइन पद्धतीने त्याचे शिक्षण सुरू आहे. काही दिवस महाविद्यालय सुरू झाल्यानंतर ते पुन्हा बंद झाले. शाळा, महाविद्यालये सुरू होत असल्याचा निर्णय चांगला आहे; मात्र कोरोनामुळे काळजी वाटते आहे.
- शीतल विजय डांगे, रा. कनकुरी, ता. राहाता.
------------
शाळा सुरू होईल, असा संदेश शाळेकडून मोबाइलवर मिळाला. त्याचवेळी काळजी वाटली. कोरोना काळात आम्ही मुलांची विशेष काळजी घेतो. शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांनीदेखील विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. नियमांचे पालन व्हावे, हीच अपेक्षा आहे. शाळा सुरू करायला हरकत नाही.
- सारिका प्रीतम गांधी, रा. आश्वी बुद्रूक, ता. संगमनेर.