अहमदनगर : अंतर्गत गटबाजीमुळे विधानसभा निवडणुकीतून मनसेचा उमेदवार नाट्यमयरित्या गायब झाला. जिल्ह्यातही मनसेला सर्व ठिकाणी उमेदवार मिळू शकले नाहीत. जिल्ह्यातील बारा मतदारसंघापैंकी केवळ चार ठिकाणी मनसे उमेदवार निवडणुकीत रिंगणात उतरले आहेत. नगर शहर मतदारसंघात मनसे पक्षांतर्गत दोन गट आहेत. संघटना व महापालिकेत हे दोन गट कार्यरत आहेत. दोन्ही गट समोरासमोर येण्याचे नेहमीच टाळतात. त्याचा फटका संघटन वाढीला बसला. ज्येष्ठ नेते वसंत लोढा व स्थायी समितीचे सभापती किशोर डागवाले या दोघांमध्ये उमेदवारीसाठी मनसेत स्पर्धा होती. महिन्यापूर्वीच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी लोढा यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला. त्यामुळे डागवाले काहीसे थंड पडले. गुरूवारी रात्रीपासून लोढा भाजपाच्या संपर्कात गेले. ही बाब समजताच पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी डागवाले यांच्याकडे धाव घेत त्यांना उमेदवारीची गळ घातली. डागवाले यांनी तातडीने शुक्रवारी कार्यकर्त्यांची बैठक बोलविली. त्यात अनेकांनी ऐनवेळेस शक्य नाही. त्यापेक्षा उमेदवारीच नको असे मत मांडले. त्यानंतर डागवाले यांनीही ऐनवेळेस कागदपत्रं जमा करणे शक्य नसल्याने मनसेतर्फे न उतरण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी रात्री राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांनी ठराविक व्यापाऱ्यांची बैठक घेतली. या सगळ्या नाट्यमय घडामोडीत नगर शहर मतदारसंघातून ऐनवेळेस मनसेवर उमेदवार न उतरविण्याची नामुष्की ओढावली. जिल्ह्यात १२ विधानसभा मतदारसंघातील नेवासा, पारनेर, शेवगाव-पाथर्डी व कर्जत-जामखेड या चारच ठिकाणी उमेदवार देता आला. (प्रतिनिधी)सभापती किशोर डागवाले यांच्याशी संपर्क साधून पुढील भूमिकेविषयी विचारले असता ते म्हणाले, संघटनेत काम करणाऱ्यांनी ऐनवेळी दगा दिल्याने ही वेळ पक्षावर आली. पक्षाच्या वरिष्ठांनी याची दखल घेत हकालपट्टी करावी. इतर कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराचे काम करणार नाही. पक्षाच्या जिल्ह्यातील उमेदवाराच्या प्रचारासाठी फिरणार आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी विश्वास ठेवून संधी दिली तर संघटन पातळीवर लक्ष देत पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले जातील.
मनसेची निवडणूक रिंगणातून माघार
By admin | Updated: September 27, 2014 23:07 IST