बोधेगाव (जि. अहमदनगर) : ठाकूर पिंपळगाव (ता. शेवगाव) येथील नदीवरील पुलाच्या नळ्यांना अडकलेल्या अवस्थेत सोमवारी सकाळी दोन मृतदेह आढळून आले. हे मृतदेह गावातीलच ज्योती अंबादास सोनवणे (२९) व दीपक अंबादास सोनवणे (८) यांचे असल्याचे निष्पन्न झाले. ही आत्महत्या की घातपात याबाबत तर्कवितर्क लढविले जात असून, घटना घडल्यापासून मृत महिलेचा पती फरार असल्याने संशय व्यक्त होत आहे.
रविवारी (दि.०८) रात्री पाऊस झाल्याने ठाकूर पिंपळगाव येथून वाहणाऱ्या नदीला पाणी आले. या नदीवरील शेवगाव-गेवराई मार्गावरील नदीपात्रात दोन मृतदेह अडकल्याचे सोमवारी (दि.९) सकाळी आठच्या सुमारास ग्रामस्थांना आढळून आले. ही माहिती समजताच बोधेगाव पोलीस दूरक्षेत्राचे नेताजी मरकड, राजू ढाकणे यांनी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने हे मृतदेह बाहेर काढून शेवगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले. मुलाचा मृतदेह पुलाच्या नळ्यांना आडव्या पद्धतीने अडकलेल्या अवस्थेत तर आईचा मृतदेह मुलापासून दक्षिणेला साधारणतः शंभर फूट अंतरावर बेशरमाच्या झाडीत आढळून आला. ते मृतदेह गावातीलच ज्योती सोनवणे व दीपक सोनवणे या मायलेकराचे असल्याचे उघड झाले. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा करीत आहेत.
...............
मुलीने दिली बोधेगाव पोलिसांना माहिती
अंबादास व ज्योती यांना दोन मुले व एक मुलगी अशी तीन अपत्ये आहेत. रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मृत ज्योती ही मुलगा दीपक याला घेऊन घराबाहेर गेली होती. त्यानंतर तासाभराने दुसऱ्या मुलाला घेऊन अंबादास घराबाहेर गेला होता. सायंकाळपर्यंत ते सर्व घरी न आल्याने मुलीने नातेवाईकांसह बोधेगाव दूरक्षेत्रात जाऊन माहिती दिली. याच दरम्यान मृत ज्योतीच्या पतीने दुसऱ्या मुलाला पैठण तालुक्यातील मावशीकडे सोडले. तेव्हापासून अंबादास गायब असल्याने या प्रकारातील गूढ वाढले असून या मायलेकराची हत्या की आत्महत्या, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.