श्रीरामपूर : बेलापूर येथील अपहरण झालेले व्यापारी गौतम हिरण यांच्या तपासाला गती मिळावी यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सामाजिक कार्यकर्ते केतन खोरे यांनी भेट घेतली. मंत्री देशमुख यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करत प्रकरणाची माहिती घेतली.
हिरण यांच्या अपहरणाला चार दिवस झाले आहेत. मात्र अजूनही पोलीस यंत्रणा आरोपींपर्यंत पोहोचू शकलेली नाही. त्यामुळे खोरे यांनी मंत्री देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी खोरे यांच्यासह तालुका केमिस्ट असोसिएशनचे सचिव सुजित राऊत उपस्थित होते.
अधीवेशनाचा कालावधी असल्याने रात्री उशिराने झालेल्या या भेटीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हिरण यांचे अपहरण प्रकरण गांभीर्याने घेतले. त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांना तत्काळ संपर्क साधला. जलदगतीने तपास करण्याची सूचना दिली, असे खोरे यांनी सांगितले. दरम्यान, गृहमंत्री देशमुख यांनी या गुन्ह्यात लक्ष घातल्याने तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.