जामखेड : नगर परिषदेस पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर आसलेल्या ११ कोटींच्या घरकुलांचे उर्वरित प्रलंबित अनुदान जमा झाले आहे. ही बैठक राजकीय श्रेय घेण्यासाठी नाही तर लाभार्थींच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी घेण्यात आली आहे. अपूर्ण असलेली घरे बांधा निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी दिले.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर असलेल्या ९३३ घरकुलांचे रखडलेले चौथ्या टप्प्यातील अनुदान आमदार पवार यांच्या पाठपुराव्यामुळे नगर परिषदेस वर्ग झाला आहे. याच अनुषंगाने त्यांनी लाभार्थींसमवेत अडीअडचणी सोडविण्यासाठी बैठक आयोजित केली होती. यावेळी नगराध्यक्ष निखिल घायतडक, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, पंचायत समिती सभापती सूर्यकांत मोरे, नगरसेवक दिगंबर चव्हाण, राजेश व्हावळ, महेश निमोणकर, गुलशन अंधारे, पवन राळेभात, मोहन पवार, विकास राळेभात, भाऊराव राळेभात, प्रधानमंत्री आवास योजनेचे इंजिनिअर अनंत शेळके, किरण भोगे, वैजिनाथ पोले आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, आता लाभार्थींनी तातडीने घरांची राहिलेली कामे पूर्ण करावीत. १०६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे पुढील महिन्यात टेंडर काढून काम सुरू होणार आहे.
घरकुलाच्या बांधकामासाठी सध्या वाळू मिळत नाही, अशी तक्रार लाभार्थींनी पवार यांच्याकडे केली होती. त्याअनुषंगाने पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली असून लवकरच वाळूचा प्रश्नदेखील सुटेल, असे सांगितले.