निंबळक : जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नगर तालुक्यातील अरणगाव (मेहेराबाद) येथे सुरू करण्यात आलेल्या शंभर बेडच्या कोविड सेंटरला शिवमुद्रा फाउंडेशनच्या वतीने आवश्यक असलेल्या औषधांची मदत देण्यात आली.
फाउंडेशनचे संस्थापक दादासाहेब दरेकर यांनी औषधे कोविड सेंटरकडे सुपूर्द केली. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, वाळकी येथील वैद्यकीय अधिकारी व कोविड केअर सेंटरचे नोडल ऑफिसर डॉ. अनिल ससाणे, डॉ. प्रणाली पोटे, शारदा खताळ, किशोर साठे आदींसह आरोग्यसेवक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
दरेकर म्हणाले, शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना अरणगाव (मेहेराबाद) येथील कोविड सेंटरमध्ये पंचवीस ते तीस रुग्ण उपचारासाठी येत आहेत. या कोविड सेंटरमध्ये औषधांची कमतरता भासत असताना सामाजिक भावनेने पुढाकार घेऊन मदत देण्यात आली आहे.